- मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवाळीसाठी ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत असताना ऑनलाइन भामटेही सक्रिय झाले आहेत. विविध फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा ‘सेल मोड’ही ऑन झाला आहे. बनावट ई-कॉमर्स साइट्स, फेक कूपन कोड्स, क्यूआर स्कॅम्स, कशबॅकच्या नावाखाली डेटा चोरणारे ॲप्स झपाट्याने वाढत आहेत.
ऑनलाईन ऑफर्सच्या नावाखाली या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे मोबाईल, कॉम्प्युटरचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन राज्य सायबर विभागाने केले आहे. अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा, असेही आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
गोल्डन अवर्स महत्त्वाचा... खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभरात हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते. फसवणुकीची रक्कम खात्यात जमा होताच, त्याच वेळेत दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते. काही प्रकरणांत विविध शॉपिंग संकेतस्थळावर खरेदीसाठी पैसे अडकवतात. मात्र, गोल्डन अवर्समध्ये १९३० हेल्पलाइनवर कॉल केल्यास तत्काळ पैसे वाचवण्यास मदत होते.
जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान सायबरशी संबंधित ३,३७२ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १,०१९ गुन्ह्यांची उकल करत ८६८ जणांना अटक केली आहे. यामध्ये खरेदीशी संबंधित ६८ तर बनावट संकेतस्थळाशी संबंधित ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. सायबरशी संबंधित ५,०८७ गुन्ह्यांपैकी खरेदीशी संबंधित ७१ तर बनावट संकेतस्थळाशी संबंधित ११५ गुन्ह्यांची नोंद पाेलिसांनी केली आहे.
सायबर भामट्यांची अशीही गुगली...? गुगलचा तपशील अचूक असण्यासाठी गुगलने सजेस्ट ॲन एडिट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो. ऑनलाईन ठगांनी हा पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापना, हॉस्पिटल, हॉटेलसह विविध शॉपिंग संकेतस्थळावरील अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाईल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे नामसाधर्म्य दिसणारे संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे वृद्धांसह उच्च शिक्षित मंडळींची फसवणूक सुरू असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.
फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत वेबसाइट वापरासायबर तज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी करताना नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा प्रमाणित ॲपवरूनच व्यवहार करा. लिंकवर क्लिक करण्याऐवजी स्वतः साइटचे नाव टाइप करा. ऑफर्सवर कधीही विश्वास ठेवू नका. बँक खाते, ओटीपी किंवा कार्ड तपशील देताना दुप्पट विचार करा. खास करून सोशल मीडियावर आलेल्या जाहिराती आणि गिफ्ट व्हाऊचर्स हे बहुतेक वेळा फसवणुकीचे हत्यार असतात. फिशिंग ई-मेल्स आणि व्हॉट्सॲप मेसेजेसमधून आलेल्या लिंक टाळा. अधिकृत पेमेंट गेटवेवरच पैसे भरा. आपल्या बँकेच्या अलर्टस् आणि ट्रान्झॅक्शन नोटिफिकेशन्स तपासा.
Web Summary : Cybercriminals are exploiting festive offers with fake sites and QR scams. The Cyber Department urges caution, advising users to only use official websites and immediately report suspicious activity to helpline 1930 to prevent financial fraud.
Web Summary : साइबर अपराधी नकली साइटों और क्यूआर घोटालों के साथ त्योहारी प्रस्तावों का फायदा उठा रहे हैं। साइबर विभाग सावधानी बरतने का आग्रह करता है, उपयोगकर्ताओं को केवल आधिकारिक वेबसाइटों का उपयोग करने और वित्तीय धोखाधड़ी को रोकने के लिए हेल्पलाइन 1930 पर संदिग्ध गतिविधि की तुरंत रिपोर्ट करने की सलाह देता है।