Join us

पडलेली झाडे तोडण्यासाठी कटरची सुविधा

By admin | Updated: October 8, 2014 23:00 IST

मुरूड शहरात नुकतेच वादळी वारा व पावसामुळे नारळ व सुपारीच्या बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले.

आगरदांडा : मुरूड शहरात नुकतेच वादळी वारा व पावसामुळे नारळ व सुपारीच्या बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले. बहुसंख्येने नारळाची झाडे उन्मळून बागायदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठी नारळाची झाडे, विजेचे पोल वीज वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा ५० तासांपेक्षा जास्त खंडित झाला होता. मोठमोठी नारळाची झाडे वाहिन्यांवर पडल्याने ती तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला गेला. यात कित्येक तास वाया गेले होते व वीजप्रवाह सुरू होण्यासही बराच कालावधी गेला होता. या सर्व गोष्टी विचारात घेवून मुरूड नगरपरिषदेतर्फे निविदेव्दारे मोठे कटर मशीन मागवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वंदना गुळवे यांनी दिली. यावेळी आरोग्य अधिकारी राकेश पाटील, प्रशांत दिवेकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिक माहिती देताना गुळवे म्हणाल्या, की मुरूड शहर हे नारळ-सुपारी, झाडांनी वेढलेले आहे. यासाठी कटर मशीन आपत्कालीन काळात खूप उपयोगी ठरणार आहे. वादळी पावसात मुरूड नगरपरिषदेतर्फे जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरची झाडे दूर करण्यात आली. शहरी नागरिकांना कोणतेही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात आली. (वार्ताहर)