Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांनी ई-फायलिंगद्वारे तक्रार करावी - न्या. भंगाळे

By admin | Updated: March 16, 2017 03:25 IST

ई-फायलिंगद्वारे ग्राहकांनी तक्रारी केल्या आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तक्रारीची सुनावणी झाली, तर ग्राहकांसह न्यायालयीन कामकाजाच्या वेळेची बचत होईल

मुंबई : ई-फायलिंगद्वारे ग्राहकांनी तक्रारी केल्या आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तक्रारीची सुनावणी झाली, तर ग्राहकांसह न्यायालयीन कामकाजाच्या वेळेची बचत होईल, असे मत राज्य ग्राहक वाद आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे यांनी व्यक्त केले. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त वैध मापन शास्त्र, शिधावाटप यंत्रणा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात भंगाळे बोलत होते.ते म्हणाले की, ई-फायलिंगद्वारे ग्राहकांना तत्काळ न्याय मिळण्यास मदत होईल. वकील इतर ठिकाणी व्यस्त असल्यामुळे अनेकदा प्रकरणांचा निकाल लागण्यास विलंब होतो. त्यामुळे या वादांसाठी वकिलांची नेमणूक टाळल्यास होणारा विलंबही टळेल व आर्थिक बचतही होईल, असे मत भंगाळे यांनी व्यक्त केले. ग्राहकांच्या दृष्टीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये शासन डिजिटल पद्धतीचा अवलंब करत असल्याचे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहसचिव स्वाती म्हसे-पाटील यांनी व्यक्त केले. शिवाय शासन सार्वजनिक वितरण प्रणालीचे तसेच वैध मापन शास्त्र यंत्रणेचे संगणकीकरणाचे काम प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ग्राहकांच्या दृष्टीने वैध मापन शास्त्र यंत्रणेने राबविलेल्या विशेष मोहिमांबाबत आणि भविष्यात या यंत्रणेद्वारे पाठपुरावा करण्यात येणाऱ्या ग्राहकाभिमुख विषयांबाबत वैध मापन शास्त्राचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली. तसेच ग्राहकांनी बदलत्या तंत्रज्ञानाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. मुंबई ग्राहक पंचायतीच्या वसुंधरा देवधर यांनी इंटरनेट व मोबाइलद्वारे फसविण्यात येणाऱ्या विविध पद्धतींवर प्रकाश टाकला. मोबाइल व विविध संकेतस्थळांवरील गेट-वेवर असणारे ‘आय अ‍ॅग्री’ हे बटन दाबण्यापूर्वी सारासार विचार करण्याचा सल्लाही देवधर यांनी दिला. या वेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)