नायगांव : राजकीय दिवाळीनंतर आता खरोखरच्या दिवाळीस प्रारंभ होत आहे. वसई परिसरात विविध विक्रेते आता दाखल झाल्याने रस्त्यांच्या दुतर्फा गजबज वाढली आहे. आकाशकंदील, तोरणे, पणत्या, रांगोळ्या, विविध रांगोळ्याच्या कागदी छाप इत्यादींनी बाजारपेठ फुलली आहे. दिवाळी हा प्रकाशचा सण म्हणून ओळखला जातो. या सणास लागणारी तोरणे भारतीय बनावटीची असावी असा विचार जरी पुढे येत असला तरी यावर्षीही इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत चायनामेड वस्तुंचा मोठा भरणा आहे. ३० रूपयांपासून सुरु होणाऱ्या या वस्तूच्या विविध आकार आणि स्वरुपात उपलब्धता आहे. लोकांची यावर्षीही चायना मेड वस्तूंना मागणी वाढली आहे.चॉकलेटसमध्येही चायनामेड चा प्रभाव दिसून येत आहे. बड्या मिठाईच्या दुकानात गिफ्ट देण्यासाठी अशी चॉकलेटस् आता उपलब्ध झाली आहे. १५० रू. पासून पुढे अशी विविध व्हरायटी आता पहायला मिळते. यावर्षी चायना मेड अतिक्रमण कमी होईल अस वाटत असताना बाजारपेठेतील चित्र मात्र विसंगत आहे.पारंपारीक पणत्या आणि रांगोळी या दोन वस्तू यात टिकून होत्या मात्र चायनामेड पणत्याही आता माफक दरात विविध आकारात उपलब्ध झाल्या आहेत. पुढील वर्षी रांगोळीमध्येही स्पर्धा ठरल्यास नवल नसावे. तूर्तास या वस्तूंच्या बाजारपेठा ओसंडून वाहू लागल्या आहेत.
चायनामेड वस्तूंना ग्राहकांची पसंती
By admin | Updated: October 21, 2014 00:31 IST