Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम, झोपडपट्टीमध्ये अळीनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 02:53 IST

पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांना सुरुवात

मुंबई : मान्सून काळात डासांची उत्पत्ती डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आमंत्रण देत असते. घराघरात साठविण्यात आलेल्या पाण्याबरोबरच बांधकामांची ठिकाणेही डासांचे अड्डे बनू लागले आहेत. डासांची ही उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बांधकामे आणि झोपडपट्ट्या तसेच अन्य ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात येणार आहे.

पावसाळ्याला महिना - दीड महिना उरला असल्याने मान्सूनपूर्व कामांनी वेग घेतला आहे. त्यानुसार पश्चिम उपनगरातील मालाड आणि पूर्व उपनगरात कुर्ला या ठिकाणी सध्या अळीनाशक फवारणी करण्यात येणार आहे. सहकारी संस्था व बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना हे काम देण्यात येणार आहे.

सर्व विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने ही फवारणी होणार आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत बहुतेक वेळा बांधकामांच्या ठिकाणी साठलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. या डासांमुळे आसपासच्या परिसरात मलेरिया आणि डेंग्यूचा आजार बळावतो. त्यामुळे खबरदारी म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे.

पालिकेच्या पाहणीत ६०६ ठिकाणी मलेरिया तर ३१०२ ठिकाणी डेंग्यूचे डास आढळून आले.पालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून केलेल्या कार्यवाहित आठ लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.मलेरियाचे डास पसरवणारा एनाफिलीस स्टिफेन्सी डासांची उत्पत्ती विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कुलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी होते.

डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती फेंगशुई, बांबू प्लँटस, मनीप्लँटससारखी शोभिवंत झाडे, घराजवळ ठेवलेल्या कुंड्या, एसी अशा ठिकाणी होत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :मुंबईडेंग्यू