Join us  

सीएसएमटी हेरिटेज इमारतीच्या घुमटाच्या सांध्यांतून होतेय गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 3:10 AM

ड्रोनद्वारे सर्वेक्षण; पुढील काही दिवसांत अंतिम अहवाल होणार सादर

- कुलदीप घायवटमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीच्या घुमटाच्या सांध्यांतून गळती होत असल्याचा प्रकार सुरू आहे. गळतीच्या मागची कारणे शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला. प्राथमिक अभ्यासातून हेरिटेज इमारतीवरील घुमटाच्या दगडांच्या सांध्यांतून गळती होत असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील काही दिवसांत या भागाचा अभ्यास करून अंतिम अहवाल सादर होणार आहे.सीएसएमटीची हेरिटेज इमारत १८८८ साली उभारण्यात आली. या वास्तूला आता १३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील टॉप दहाच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची नोंद आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात अचानक इमारतीच्या डोममध्ये, घुमटाच्या ठिकाणी गळती सुरू झाली. यामागची कारणे शोधण्यासाठी इमारतीच्या आतील आणि बाहेरील चारही बाजूंचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली.सीएसएमटी हेरिटेज इमारतीचे २००१ ते २००८ मध्ये सर्वेक्षण केले होते. मात्र तेव्हा डोम गळती होत नव्हती. मात्र डोमच्या बाहेरील दगडाच्या सांध्यापासून आतील दगडाच्या सांध्यामधील फट वाढली आहे. या फटीतून पाण्याची गळती होत असल्याचे प्राथमिक अभ्यासात दिसून येत आहे, असे वास्तू वारसातज्ज्ञ चेतन रायकर यांनी सांगितले.या वास्तूच्या घुमटाला, डोमला दगडाचे स्तर किती आहेत, कोणत्या ठिकाणाहून दगडाच्या सांध्यातून पाणी आत शिरत आहे, बाहेरच्या स्तरापासून ते आतल्या थरापर्यंत भेगा आहेत का, या भेगा कुठे आणि किती पडल्या आहेत, याचा ड्रोनद्वारे शोध घेतला. ड्रोनद्वारे काढलेल्या फोटोतून तपासणी करून याच अभ्यास केला जात आहे. पुढील काही दिवसांत अंतिम अहवाल येईल. त्यानंतर या गळतीवर उपाययोजना शोधण्यात येईल. या कामासाठी रेल्वेकडून सहकार्य मिळत असल्याचे रायकर यांनी सांगितले.ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याने इमारतीचा ‘टॉप व्ह्यू’ सहज पाहता येणे शक्य आहे. हेरिटेज इमारतीच्या चारही बाजूने लोखंडी परात बांधून सर्वेक्षण करता आले असते, मात्र हे काम ड्रोनच्या सर्वेक्षणापेक्षा जास्त खर्चीक आहे. प्रत्यक्षात काम करताना लोखंडी परात बांधून काम केले जाणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.