Join us  

‘सीएसएमटी’ला आज १३० वर्षे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:45 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

मुंबई : फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वास्तूला रविवारी १३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पूर्वसंध्येला या ऐतिहासिक वास्तूला दिव्यांनी सजविण्यात आले. २० मे १८८८ साली या वास्तूची उभारणी करण्यात आली. २००४ साली युनेस्कोच्या वतीने या वास्तू वैभवाला ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थळ देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे, २०१६ साली देशातील १० महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये यास निवडण्यात आले.वास्तूच्या बांधणीची सुरुवात मे १८७८ साली करण्यात आली. ग्रेट इंडियन पेनिनस्युला (जीपीआय) रेल्वे कार्यालयास एफ.डब्ल्यू. स्टीवन्स परामर्श या वास्तुकाराच्या साहाय्याने ‘सी’ अक्षराचे डिझाइन देण्यात आले. वास्तूचे नाव व्हिटोरिया टर्मिनस ठेवण्यात आले. त्यानंतर, १९९६ साली व्हिटोरिया टर्मिनस हे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस नाव ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी टर्मिनस वास्तू डिसेंबर २०१२ पासून सर्वांसाठी खुली करण्यात आली. जुलै २०१७ मध्ये या छत्रपती शिवाजी टर्मिनसचे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे नामकरण करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची निर्मिती करण्यासाठी त्या काळी १६.१४ लाख रुपये खर्च करण्यात आले. या वास्तूची निर्मिती करताना भारतीय वास्तुकला लक्षात घेऊन गॉथिक शैलीत या वास्तूची उभारणी करण्यात आली. इंग्रजी आद्यक्षरातील ‘सी’ अक्षराच्या आकारात एक अत्याधुनिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्व-पश्चिमरीत्या बांधकाम करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वास्तूच्या शताब्दी उत्सवाच्या निमित्त एक पत्र तिकीट जारी करण्यात आले आहे. २०१३ मध्ये जेव्हा या वास्तूचा १२५वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, तेव्हा एक विशेष पोस्टल कव्हर सुरू करण्यात आले.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी म्हणाले, या वास्तूमधील सर्वात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे, वास्तूचा मुख्य घुमट व त्यावरील १६.६ इंच उंच पुतळा. या पुतळ्याच्या एका हाताच्या खाली नक्षीदार चाक आहे. दुसऱ्या हातात मशाल आहे, जे प्रगतीचे प्रतीक दर्शवित आहे. इटालियन गॉथिक शैलीत पट्ट्यासह अष्टकोनाचा घुमट तयार केलेली ही पहिलीच वास्तू असल्याचे सांगण्यात आले.अशी आहे रचनाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर ६ फलाटांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी १०.४ लाख रुपये खर्च करण्यात आले.त्यानंतर, १९२९ मध्ये पुन्हा बांधणी करतेवेळी १३ फलाट बनविण्यात आले. १९९४ साली यार्डचे परिवर्तन करण्यात आले आणि २ फलाट अधिक वाढून १५ फलाट करण्यात आले. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला एकूण १८ फलाट आहेत. पूर्व बाजूला विस्तृत प्रवेशद्वार आहे.

टॅग्स :रेल्वेमुंबई