Join us
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत म्हटले की, मुंबईतील गर्दीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत म्हटले की, मुंबईतील गर्दीवर निर्बंध घातले नाहीत किंवा नियंत्रण ठेवले नाही तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या शहराची अवस्था झाली होती, त्याची पुनरावृत्ती होईल. तज्ज्ञांच्या मते, आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत, असेही उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.

प्रशासनाने व नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून शिकावे. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता, न्या. अमजद सय्यद, न्या. के. के. तातेड व न्या. पी. बी. वराळे यांच्या पूर्णपीठाने म्हटले.

सोमवारी उच्च न्यायालयाची प्रशासकीय बैठक घेण्यात आली. त्यात वकील व अन्य क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश होता. त्यात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांचाही समावेश होता. त्यांनी आम्हाला सांगितले की, तिसरी लाट दारात येऊन ठेपली आहे. कोरोनासंदर्भातील सर्व काळजी घेतली नाही तर राज्यामध्ये अत्यंत धोकादायक स्थिती असेल. एप्रिल २०२२ पर्यंत देशाची कोरोनामधून सुटका नाही, असे पंडित यांनी सांगितल्याचे मुख्य न्या. दत्ता यांनी म्हटले.

अनेक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांवरून मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, मरिन ड्राईव्ह येथे गर्दी उसळत असल्याचे दिसते. तुम्ही (सरकार) जर यावर निर्बंध आणले नाहीत किंवा नियंत्रण ठेवले नाही तर पुन्हा तीच स्थिती निर्माण होईल. आपल्याला अनुभवावरून शिकले पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने सर्व कनिष्ठ न्यायायाने, लवाद व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर व गोवा खंडपीठाने दिलेले अंतरिम आदेश ३० सप्टेंबरपर्यंत कायम केले.

या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा हे पूर्णपीठ २४ सप्टेंबर रोजी बसेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.