अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. लाखो भाविकांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात कालपासूनच रांगा लावल्या होत्या. भाविकांसाठी मंडपामध्ये मोफत चहाची व्यवस्था तसेच लाइट, फॅन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मंदिराच्या बाहेरील परिसरात भाविकांसाठी सूचनाफलकही लावण्यात आले आहेत. त्यात मोबाइल, पर्स अशा आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा, लॅपटॉप आणि कॅमेरे आणू नये, फराळाकरिता धातूचे डबे न आणता प्लास्टिकचे डबे आणावे आणि भाविकांनी रांगेतून शांततेने दर्शन घ्यावे, अशा सूचनाही लावल्या होत्या. अंगारकीमुळे सिद्धिविनायक परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.