Join us  

'अंगारकी चतुर्थी'निमित्त भाविकांची गर्दी, जाणून घ्या मंगळवारच्या संकष्टीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 8:42 AM

अंगारकी चतुर्थीदिनी सुर्योदयापूर्वी स्नान करणे चांगले असते. त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करुन दिवसाची सुरुवात केल्यास मन:शांती लाभते

मुंबई - आज अंगारकी संकष्टी चतुर्थीमुळे सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. गणपत्ती बाप्पासाठी मंदिरात 6 हजार फुलांची आरास केली असून मंदिर परिसरात विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. तर, पुण्यातील दगडशेठ हलवाई गणेश मंदिरातही मोठी सजावट करण्यात आली असून सकाळपासूनच भक्तांनी दर्शनसाठी रांग लावली आहे. वर्षभरात जेवढ्याही गणेश चतुर्थी असतात, त्यापैकी अंगारकी चतुर्थीचे वेगळेच महत्व आहे. यापूर्वी एप्रिल आणि जुलै महिन्यात अंगारकी चतुर्थी साजरी करण्यात आली होती. 

अंगारकी चतुर्थीदिनी सुर्योदयापूर्वी स्नान करणे चांगले असते. त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करुन दिवसाची सुरुवात केल्यास मन:शांती लाभते. गणपती बाप्पाच्या पुजेसाठी धूप, दिप, पुष्प, दुर्वा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर “ॐ ग़ं गणपतए नमः” असा जप करुन बाप्पांची मनोभावे सेवा करावी. अंगारकी चतुर्थीदिनी आजचा चंद्रोदय रात्री 9.01 वाजता होणार आहे. 

* कथा अंगारकी चतुर्थीची

गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भरद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला. त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून श्रीगणेशाला प्रसन्न केलं.त्रैलोक्यात प्रसिद्ध व्हायचा वर त्यानं प्रसन्न झालेल्या गणेशाकडे मागितला. त्यावर गणेशानं, आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं. `तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारकासारखा लाल आहे, म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल, या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्ती व पुण्यप्रद प्राप्ती होईल. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील` असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि श्रीगणेशाच्या वरदानामुळे या अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरगणपतीदगडूशेठ मंदिर