Join us  

इंग्लिश खाडी पार करणे आव्हानात्मक; संफायर ते केप ग्रीस अंतर १३ तास २६ मिनिटांमध्ये केले पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:29 AM

इंग्लिश खाडी पोहणे हे जलतरणात माऊंट एवरेस्ट सर केल्यासारखे आहे. इंग्लिश खाडी पार करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून व्यायाम, सराव आणि योग केला.

मुंबई : इंग्लिश खाडी पार करणे हे खडतर आव्हान असते. १० पैकी केवळ ४ जलतरणपटूच हे आव्हान पेलू शकले आहेत. २३ आॅगस्ट रोजी संफायर ते केप ग्रीस हे अंतर मी १३ तास २६ मिनिटांमध्ये पार केले. पण ऊन, लाटा, माशांचा अडथळा अशा मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, मी जिद्द सोडली नाही. त्यामुळेच मला यश प्राप्त झाले, असे मत सर्वात कमी वयात इंग्लीश खाडी पार करणारी गौरवी सिंघवी हिने पत्रकार परिषदेत मांडले.

गौरवी म्हणाली, रात्रीचे पोहणे धोकादायक असते. अनेकदा जेली फिशचा अडथळा येत होता. दिवसा ऊन लागत असल्याने पाणी गरम झाले होते. शरीराची हालचाल तीव्र गतीने होत असल्यामुळे खूप भूक लागत होती. त्यामुळे थकवाही येत होता. मात्र, ती हार पत्कारली नाही. त्यामुळेच सर्वात लहान जलतरणपटू म्हणून माझ्या नावाची नोंद झाली.

इंग्लिश खाडी पोहणे हे जलतरणात माऊंट एवरेस्ट सर केल्यासारखे आहे. इंग्लिश खाडी पार करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून व्यायाम, सराव आणि योग केला. त्याचा फायदा झाला, असेही तिने सांगितले. अरबी समुद्रात जुहू-खारदंडा ते गेटवे आॅफ इंडिया हे ४७ किमी अंतर ९ तास आणि २२ मिनिटांमध्ये पार करण्याचा रेकॉर्ड तिच्या नावावर आहे.सुविधांची कमतरताजलतरणपटूसाठी लहान शहरांमध्ये योग्य त्या सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक जलतरणपटूंना पुढे येता येत नाही. काही जलतरणपटू केवळ जीद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुढे येतात. त्यांना स्थानिक पातळीवर सुविधा मिळाल्यास जलतरणपटूंची संख्या वाढेल, असे गौरवी म्हणाली.