Join us

गर्दीतील गुन्हेगार शोधणार सॉफ्टवेअर

By admin | Updated: October 24, 2014 01:01 IST

एखाद्या गुन्हेगाराच्या गैर हालचालीवर नजर ठेवने पोलीसांना यापुढे सहज शक्य होणार आहे

सुर्यकांत वाघमारे, नवी मुंबई एखाद्या गुन्हेगाराच्या गैर हालचालीवर नजर ठेवने पोलीसांना यापुढे सहज शक्य होणार आहे. त्याकरिता गर्दीमध्येही गुन्हेगाराला ओळखेल अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बनवण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. हे सॉफ्टवेअर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना जोडून त्याद्वारे गुन्हेगार शोधण्याचे काम करता येणार आहे.नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी आधुनिकरणाकडे पाऊल उचलत आहे. सध्या सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, दरोडे अशा घटना वारंवार शहरात घडत आहेत. अशा बहुतेक घटनांमध्ये शहराबाहेरील गुन्हेगारांचा हात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. दुचाकीवरून शहरात येऊन गुन्हे करायचे व सहज शहराबाहेर पळून जाण्यात हे गुन्हेगार पटाईत झाले आहेत. पळून जाताना गुन्हेगारांनी वापरलेले हेल्मेटच त्यांना पोलिसांच्या नजरेतून वाचवत आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेले हेल्मेटच गुन्हेगारांचे बचावाचे साधन ठरत असल्याची खंत देखील पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी व्यक्त केली आहे. परंतु यापुढे गुन्हेगारांची चेहरापट्टी ओळखण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर सर्व दुचाकीस्वारांची छायचित्रे घेतली जाणार आहेत. त्याकरिता प्रवेशद्वारांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापुढे दुचाकीस्वाराला हेल्मेट काढून आपला चेहरा दाखवावा लागणार आहे. त्याद्वारे नवी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही आयुक्त के. एल. प्रसाद यांनी सांगितले. अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम करणारे हे सॉफ्टवेअर लवकरच पोलीस दलात दाखल होणार आहे. विशेष तज्ञांचे पथक पोलिसांच्या मार्गदर्शनाद्वारे हे सॉफ्टवेअर बनवण्याचे काम जलदगतीने करत आहे. प्रत्यक्षात हे सॉफ्टवेअर कार्यरत होताच पोलिसांना तपासकामात मोठा हातभार लागेल असा विश्वास गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केला आहे.