Join us

बिल्डरसह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: July 14, 2015 23:07 IST

इमारतीच्या टेरेसवर अनधिकृत बांधकाम करून राजेश खंडेलवाल यांच्या सदनिकेचा दरवाजाच बंद करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक जितू ठक्कर याच्यासह सोसायटीच्या

ठाणे : इमारतीच्या टेरेसवर अनधिकृत बांधकाम करून राजेश खंडेलवाल यांच्या सदनिकेचा दरवाजाच बंद करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक जितू ठक्कर याच्यासह सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात खोटी कागदपत्रे तयार करणे आणि अनधिकृत बांधकाम करणे, अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.ठाण्याच्या हरिनिवास सर्कल येथील ‘कल्पतरू’ सोसायटीमधील ए-२७ या सदनिकेत ते वास्तव्याला असून लगतची टेरेस ही त्यांच्या आजोबांच्या नावावर आहे. या टेरेसवर जाण्यासाठी त्यांच्या बेडरूममधून आणि बी विंगमधून असा दोन्ही मार्गांनी प्रवेश आहे. त्यांनी पावसाचे पाणी बेडरूममध्ये येऊ नये म्हणून टेरेसवर लोखंडी पत्रे लावले होते. मात्र, सोसायटीचे चेअरमन शांतिलाल शहा, खजिनदार पीयूष शहा आणि सेक्रेटरी नारायण कुतडकर यांनी बिल्डरने टेरेस विकली नसल्याची खोटी कागदपत्रे बनविली. त्यानंतर, बी विंगवाटे जाणारा खंडेलवाल यांच्या मालकीचा दरवाजा त्यांच्या परवानगीशिवाय तोडून त्यांनी लावलेले पत्रे, इलेक्ट्रीक वायर आणि फरशी तोडून तिथे अनधिकृतपणे कमी उंचीची शेड बांधून त्यांच्या बेडरूमचा टेरेसवर उघडणारा दरवाजाच बंद केला. याप्रकरणी त्यांनी थेट न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाने याप्रकरणी नौपाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आॅगस्ट २०१३ ते जुलै २०१५ या कालावधीत सुरू असलेल्या याप्रकरणी ११ जुलै रोजी बिल्डरसह सोसायटीच्या तिघा पदाधिकाऱ्यांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन.एस. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.