Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या पितापुत्राविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुरारगाव परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या पितापुत्राविरुद्ध कुरार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुरारगाव परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या पितापुत्राविरुद्ध कुरार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मामू पठाण (६०) आणि जुबेर पठाण (४०) अशी पितापुत्रांची नावे आहेत.

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, कुरार गाव परिसरात वडिलांचा ऑनलाइन सेवा पुरविण्याचा व्यवसाय आहे. २३ मे रोजी वडील बाहेर गेले असताना, दुपारी एकच्या सुमारास मामूने तरुणीला पाहून शिवीगाळ केली. तिने याबाबत जाब विचारताच, त्याने कार्यालयाबाहेर प्लास्टिक कॅरेट ठेवू नको; तसेच दुचाकीही पार्क करायची नाही, असे सांगितले. तरुणीने ते हटविण्यास नकार देताच, मामू आणि त्याचा मुलगा मारण्यासाठी अंगावर धावून गेला. यादरम्यान तरुणीसोबत असभ्य वर्तन केले, अशी तिची तक्रार आहे.

सुरुवातीला पोलिसांनीही एनसी दाखल करत तरुणीला घरी पाठवले. अखेर वरिष्ठांपर्यंत प्रकरण जाताच या प्रकरणी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्याचे तरुणीने सांगितले. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी तरुणीने केली आहे.

* महिला पोलिसाकडूनही अपमानास्पद वागणूक!

तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी तक्रार देण्यासाठी जाताच कर्तव्यावर असलेल्या महिला उपनिरीक्षकाने मला ओरडायला सुरुवात केली. त्यासोबत पोलीस शिपाईही माझ्यासाेबत ओरडून बोलू लागले. माझ्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी मी कुरार पोलीस ठाणे येथे गेले हाेते, परंतु न्याय मिळण्याऐवजी मला अपमान सहन करावा लागल्याचा आरोप तरुणीने केला आहे. संबंधित महिला पोलिसाविरुद्ध तिने पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

......................................