मुंबई : दोन आठवडय़ांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटपटू फिल ह्यूज याच्या अपघाती निधनाची घटना ताजी असतानाच मुंबईच्या क्रिकेट मैदानावर देखील अशीच घटना घडली. ओव्हल मैदान येथे सुरु असलेल्या एका व्यावसायिक सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तीस वर्षीय रत्नाकर मोरे या तरुण खेळाडूचा मृत्यू झाला.
टाटा स्पोर्ट्स क्लबच्या विभागीय स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून खेळत असलेला रत्नाकर मोरेला सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातंच अस्वस्थ वाटू लागले. यानंतर काही क्षणातंच मोरे याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तो खाली कोसळला.
याबाबत मोरे याच्या संघसहका:यांनी सांगितले की, मैदानात अचानक त्याला पडल्याचे पाहून प्रथम त्याला चक्कर आली असेल असे वाटले. मात्र त्याच्या जवळ गेल्यानंतर काहीच हालचाल दिसत नसल्याचे पाहून आम्ही रुग्णवाहिका बोलवली. यावेळी मोरे याला सर्वप्रथम बॉम्बे रुग्णालयात व नंतर जीटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती अशी माहिती यावेळी मिळाली. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई क्रिकेट संघटनेचे खजिनदार विनोद देशपांडे यांनी सांगितले की, ही धक्कादायक घटना आहे. या स्पर्धेला जरी एमसीएची मान्यता असली, तरी खेळाडूंची संपूर्ण जबाबदारी ही स्पर्धा आयोजकांची आहे. एमसीएच्या आयोजनाखाली स्पर्धा होते त्यावेळी एमसीए काळजी घेत असते.