Join us
Daily Top 2Weekly Top 5

कफ परेडचा फौजदार नाट्यमयरीत्या गायब

By admin | Updated: November 5, 2014 03:55 IST

कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले संजय चव्हाण(४२) हे रविवारपासून नाट्यमयरीत्या गायब झाले

मुंबई : कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले संजय चव्हाण(४२) हे रविवारपासून नाट्यमयरीत्या गायब झाले असल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या चव्हाण यांचा थांगपत्ता नसल्याने कुटुंबीयांनी नागपाडा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. तसेच गुन्हे शाखेनेही चव्हाण यांच्या शोधार्थ हालचाली सुरू केल्या आहेत.पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चव्हाण हे नागपाड्याच्या पोलीस वसाहतीमध्ये पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी रात्रपाळीला कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले चव्हाण रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात पोहोचले नाहीत. यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी संपर्क केला. मात्र ते सायंकाळीच घरातून बाहेर पडल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांना सांगितले.चव्हाण हे सोमवारी सकाळपर्यंत पोलीस ठाणे आणि घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नागपाडा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. चव्हाण यांचा मोबाइल कुटुंबीयांना घरात मिळाला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. ते कोणत्याही कामाच्या किंवा कौटुंबिक तणावाखाली नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले असल्याचे कळते. (प्रतिनिधी)