Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मैथिली'तून महिला कलाकारांची सृजनशील अभिव्यक्ती; द आर्ट एन्ट्रन्स कला दालनात सामूहिक प्रदर्शनाचे आयोजन

By स्नेहा मोरे | Updated: November 28, 2023 19:13 IST

भारतीय लोककलेपासून प्रेरणा घेऊन प्रतिभा वाघ यांनी निसर्ग हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे.

मुंबई : काळा घोडा असोसिएशन तर्फे ‘मैथिली’ या पाच महिला कलाकारांचे चित्र प्रदर्शन १० डिसेंबर पर्यंत मुंबई येथील कुलाबा काळाघोडा येथील आर्ट एन्ट्रन्स कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रतिभा वाघ, ज्योत्स्ना सोनवणे, रेखा भिवंडीकर, मिता व्होरा, पानेरी भिवा पुणेकर या चित्रकारांच्या कलाकृती रसिकांना प्रदर्शनात पाहायला मिळतील.

या प्रदर्शनात सहभागी चित्रकारांची स्वतःची अशी वेगळी शैली कला रसिकांना चित्र उत्सवाचे दर्शन घडवणार आहे. या प्रदर्शनात कॅनव्हासवरील उत्स्फूर्त रंग, अद्भुत आकार यांच्या स्वरूपातील चैतन्यमय ऊर्जा कला रसिकांना वेगळ्या स्वरुपाचा अनुभव देणार आहे. रेखा भिवंडीकर यांच्या चित्रातून नातेबंधांच्या प्रतिमा, विशेषतः आई आणि मुलीच्या नात्याची प्रतिमा मुलीच्या नजरेतून व्यक्त होते. मुलीच्या भावविश्वामध्ये चाळीतील खोली, कुटुंब, डोकावून पाहणारे शेजारी, पायाशी घोटाळणारे मांजर, गावच्या घराची ओटी, आजीचा वावर, प्राजक्ताचे झाड अशा प्रतिमा येत राहतात, या प्रतिमा म्हणजे जणू गोठलेला भूतकाळ आहे. चित्रकार मिता व्होरा यांनी या प्रदर्शनात वाघांची चित्रे प्रदर्शित केली आहेत. वाघ हा शक्ती, चैतन्य आणि आरोग्य यांचे प्रतीक आहे. मिता यांनी चित्रातून या शक्तिशाली वाघांचे तपशीलवार आणि वास्तववादी चित्रण केले आहे. शाई आणि मर्यादित रंग यांचा वापर करूनही वाघांचे जिवंत चित्रण कॅनव्हासवर पाहता येते,ही शैली वाघासारख्या प्राण्याला वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर प्रकट करते. पानेरी भिवा पुणेकर यांनी बनारस अथवा कशी येथील आध्यात्मिक जीवन कॅनव्हासवर जिवंत केले आहे. काशी या तीर्थक्षेत्राची भव्यता कॅनव्हासवर लीलया चित्रित करणारी पानेरी यांची कला साधनाच त्यांच्या चित्रातून दिसून येते.

निसर्ग देतोय कलेची प्रेरणाभारतीय लोककलेपासून प्रेरणा घेऊन प्रतिभा वाघ यांनी निसर्ग हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, त्या मोबदल्यात आपण त्याची परतफेड कशी करतो? असा प्रश्न या चित्रांमधून त्या मानवाला विचारीत आहेत. जोत्स्ना सोनवणे या प्रामुख्याने अमूर्त शैलीमध्ये काम करतात. आपल्या कलाकृतींविषयी ज्योत्स्ना सांगतात, चित्रकला म्हणजे बाह्यजगातील कोलाहलापासून दूर अंतर्मनाकडे केलेला प्रवास होय. निसर्गामधून प्रेरणा घेऊन कॅनव्हासवर निसर्गातील घटकांचे चित्रण करतात. यात दगड, लाकूड यांच्यावरील सूक्ष्मातिसूक्ष्म आकारांचा समावेश होतो. रेषांचे चैतन्यमय फटकारे, रंगांचे अद्भुत नाट्य ज्योत्स्ना यांची चित्रकलेतील प्रगल्भता दर्शवतात. 

टॅग्स :मुंबई