Join us

सासरच्यांना धडा शिकविण्यासाठी रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 02:26 IST

हुंडाबळीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पत्नी व सासरच्या मंडळींना धडा शिकविण्यासाठी उत्तर प्रदेशातील एका तरुणाने स्वत:च्या हत्येचा रचलेला बनाव मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या तपासामुळे उघड झाला आहे.

मुंबई : हुंडाबळीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पत्नी व सासरच्या मंडळींना धडा शिकविण्यासाठी उत्तर प्रदेशातील एका तरुणाने स्वत:च्या हत्येचा रचलेला बनाव मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या तपासामुळे उघड झाला आहे. कक्ष-८च्या पथकाने त्याला पकडून पितळ उघडकीस आणले. पन्नालाल यादव (वय ३५) असे त्याचे नाव असून मीरा रोड परिसरातून त्याला अटक करण्यात आली.उत्तरप्रदेशात खून झाल्याची नोंद असलेला पन्नालाल हा जिवंत असून तो मीरारोड परिसरात राहत असल्याची माहिती कक्षाचे प्र्रभारी संजय साळुंखे यांच्या पथकाला मिळाली. गेल्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते. यादव हा मिरारोड येथे रहात असून, भिवंडीतील एका कंपनीत कामाला होता. पथकाने त्याला ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्याने हत्येच्या बनावाची कबुली दिली.त्याच्या माहेरच्या मंडळींनी २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा तेथील कोलहूइ पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मनस्त:प सहन करावा लागला. याचा बदला घेण्याचे त्याने ठरविले. मेव्हण्यासोबत एके ठिकाणी जात असतना अचानक बेपत्ता झालो. त्यानंतर काही दिवसांनी वडिलांना पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची तक्रार देण्यास सांगितल्याचे पन्नालालने पोलिसांसमोर कबूल केले. त्याला लवकरच उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.