Join us
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांच्या विकासासाठी सर्किट योजना तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - मुंबईसह राज्यभरात अनेक किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून, त्यांचे जतन, संवर्धन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - मुंबईसह राज्यभरात अनेक किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून, त्यांचे जतन, संवर्धन काळानुरुप होणे आवश्यक आहे. या किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील किल्ले, सागरी किल्ले, राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वैभव जपत असताना, गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.

महाराष्ट्राचे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून, हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे, या बाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती स्थापन केली आहे. या समितीने कोविडच्या काळात दोन बैठका केल्या आहेत. राज्य संग्रहालयासंदर्भात पुढील बाबी ठरविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात यावी, असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.

कर्नाटक राज्यात शहाजी राजे यांची समाधी असून, तेथे सरकारतर्फे त्यांचा पुतळा उभारता येईल, हे पाहण्यासाठी पुरातत्व संचालकांनी स्वत: तेथे जाऊन त्या जागेची पाहणी करावी. पुराभिलेख संचालनालयाकडे असलेला ऐतिहासिक वारसा डिजिटल स्वरुपात जतन करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. या बैठकीस, सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव जाधव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक तेजस गर्गे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित उगले आदी उपस्थित होते.