मुंबई : केंद्र आणि राज्य शासनामार्फत जनतेविरोधी धोरणे राबविण्यात येत असल्याबद्दल माकपने देशव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. या मोर्चाची सुरुवात मुंबईतील मोर्चाने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने भायखळा राणीबाग ते आझाद मैदानापर्यंत राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला झालेली फाशी कायद्यानुसार योग्य आहे. परंतु या बॉम्बस्फोटाला कारणीभूत ठरलेल्या मुंबई दंगलीसाठी जबाबदार व्यक्तींवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी या वेळी केली. १ ते १४ आॅगस्टपर्यंत देशभरात विविध राज्यांमध्ये सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही सरकारने जनतेच्या हितासाठी धोरणे न राबविल्यास आंदोलन आखणी तीव्र करण्यात येईल, असे येचुरी यांनी सांगितले. केंद्र सरकारचे धोरण धनाढ्यांसाठी असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही येचुरी म्हणाले.- येचुरी यांच्या नेतृत्वाखाली माकपच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे एक निवेदन दिले. यात महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजांवर कडक कारवाई, रेशनमधील केरोसिनचा कोटा प्रतिव्यक्ती प्रतिमहिना किमान दोन लीटरपर्यंत वाढवा, आधार जोडणी अनिवार्य न करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश अमलात आणा, स्वस्त धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचे धोरण राबवू नका आदी मागण्यांचा समावेश आहे.
माकपचा आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: August 2, 2015 03:30 IST