Join us  

गोमुत्राने कर्करोग बरा होत असल्याचा दावा चुकीचा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 5:09 AM

मुंबई : गोमूत्र घेतल्यामुळे कर्करोग बरा झाला, या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. हे ...

मुंबई : गोमूत्र घेतल्यामुळे कर्करोग बरा झाला, या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. हे विधान चुकीचे असल्याचे सांगत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त करीत तीव्र निषेध केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या या विधानात काहीही तथ्य नसल्याचे मत टाटा रुग्णालयाचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी व्यक्त केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले हे विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. गोमूत्रामुळे कर्करोग बरा होतो, असा दावा साध्वी प्रज्ञासिंह यांनी एका मुलाखतीत केला. या वेळी, माझा कर्करोग गोमूत्र पिल्यानेच बरा झाल्याचे त्यांनी सांगितले. गाईच्या पाठीवरून हात फिरविल्यानंतर माणसाचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, असेही त्या म्हणाल्या. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले. डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले की, अशा वक्तव्यामुळे काही लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. ्रबऱ्याचदा योग्य औषधे न घेता असे काही चुकीचे प्रकार केल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढते, तो शरीरात पसरतो. आपल्या देशात अनेकदा कर्करोगाचे निदान तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात होते. याचे कारण जनजागृती, आरोग्यसेवेचा अभाव हे आहे. त्यात अशा वक्तव्यांमुळे चुकीच्या समजुती पसरतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन त्वरित वैद्यकीय सल्ला आणि उपचार करावेत.

‘त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा’टाटा रुग्णालयाचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले की, साध्वी यांचे वक्तव्य खोटे असून दिशाभूल करणारे आहे. यामुळे कर्करोग रुग्णांमध्ये गैरसमजुती पसरू शकतात. सामान्यांनी अशा वक्तव्यांवर विश्वास ठेवू नये आणि कर्करोगाची कोणतीही लक्षणे, पूर्वलक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. कर्करोगतज्ज्ञ डॉ. निरंजन बामणे यांनी सांगितले की, सध्या सोशल मीडियामुळे हे वक्तव्य फार वेगाने व्हायरल होत आहे. मात्र यावर नियंत्रण असले पाहिजे, कारण रुग्णसेवेवर चुकीचा परिणाम करणारे हे वक्तव्य आहे. यामुळे वेळीच यातील असत्यता ओळखून याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

टॅग्स :कर्करोगसाध्वी प्रज्ञावैद्यकीयडॉक्टर