Join us

कोविडचे संकट अभूतपूर्व, झोकून देऊन काम करा - पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 05:00 IST

अभूतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून द्यावे, असे आवाहनही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केले.

मुंबई : कोविडच्या महामारीने गंभीर रूप घेतले असून, या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. या अभूतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून द्यावे, असे आवाहनही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केले.कोरोना महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्य शासन, पोलीस व प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका व संलग्न कर्मचारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे. या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जनतेने तंतोतंत पालन करावे. गर्दी टाळणे, अंतर राखणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे वगैरे सूचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ अथवा कोणतेही गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :शरद पवारकोरोना वायरस बातम्या