Join us  

प्रश्न तुमचे, उत्तरं डॉक्टरांची; कोरोनाविषयक प्रश्नांबद्दल डॉ. संजय ओक यांच्याशी थेट संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 8:47 AM

कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी आज दुपारी ३ वाजता थेट बातचीत

मुंबई: गेल्या महिनाभरापासून राज्यासह देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. देशात काल दीड लाखाहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी ५० हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले होते. त्यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांचीदेखील चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल अनेकांना अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न लोकमत करत आहे. त्यासाठी कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी आज दुपारी ३ वाजता त्यांच्याशी बातचीत करणार आहेत.कोरोनामुळे निर्माण झालेले प्रश्न, तुम्हाला रोज आरोग्यविषयक भेडसावणारे प्रश्न, या आजाराचे दुष्परिणाम, कोणती काळजी घेतली पाहिजे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी थेट बातचीत करता येईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत आताची कोरोना लाट अधिक भीषण आहे. कोरोना रुग्णांना लक्षणंच जाणवत नसल्यानं परिस्थिती बिकट बनली आहे. गेल्या वर्षी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० टक्के जणांना कोरोनाची लागण व्हायची. मात्र आता हे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत गेलं आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून बचाव कसा करायचा, याबद्दल डॉ. संजय ओक मार्गदर्शन करणार आहेत. लोकमतच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनेलवर डॉ. ओक यांच्यासोबतचा संवाद पाहता येईल. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या