Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायन रुग्णालयात कोव्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात केल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या कोविशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. तर पालिकेच्याच सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून, शनिवार ते आतापर्यंत १५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

कोव्हॅक्सिन ही लस दिल्यावर त्या स्वयंसेवकाला किमान अर्धा तास रुग्णालयात विश्रांती करण्यासाठी सांगितले जाते. त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येते. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास त्यांना घरी पाठवण्यात येते. स्वयंसेवकावर घरी गेल्यानंतरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे डॉ. एन. अवध यांनी सांगितले.

* जे.जे. रुग्णालयात १८६ जणांना डोस

जे.जे. रुग्णालयात १८६ जणांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. आयसीएमआरच्या नियमांनुसार, प्रत्येक सेंटरमध्ये किमान हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाईल. शिवाय, प्रत्येक क्लिनिकल ट्रायलला विमा दिला आहे. क्लिनिकल ट्रायलदरम्यान स्वयंसेवकांना होणारा किंवा झालेला त्रास पाहून एथिक कमिटी आणि डीसीजीआयची कमिटी त्यावर निर्णय देईल. किमान वर्षभर चालणारी ही प्रक्रिया आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने ही लस तयार केल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील कोव्हॅक्सिन क्लिनिकल ट्रायलचे सहअन्वेषक डॉ. दिनेश धोदी यांनी दिली.

........................