Join us

राज्यात पुढील आठवड्यात सर्व जिल्ह्यांत कोव्हॅक्सिन लसीची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात आतापर्यंत केवळ सहा केंद्रांवर उपलब्ध असणारी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ही लस सर्व जिल्ह्यांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात आतापर्यंत केवळ सहा केंद्रांवर उपलब्ध असणारी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ही लस सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यासाठी काेव्हॅक्सिन लसीची चाचणी सध्या क्लिनिकल ट्रायल मोडअंतर्गत सुरू आहे. कोविशिल्ड लसीच्या तुलनेत या लसीला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.

केंद्र शासनाकडून राज्याला कोव्हॅक्सिन लसीचे दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ५० हजार ४०० डोस उपलब्ध झाल्यानंतर राज्य शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी याविषयी सांगितले की, राज्यातील कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्रांमध्ये येत्या काही दिवसात वाढ करण्यात येईल. या केंद्रांची संख्या तीस करण्यात येणार आहे. राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

* सर्वाधिक डोस तामिळनाडूत

देशभरात १९ राज्यांमध्ये कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे, त्यात सर्वाधिक डोस तामिळनाडू राज्यात उपलब्ध झाले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात १ लाख ७० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. देशभरात सर्वात कमी डोस केरळ राज्याला उपलब्ध झाले होते. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील छोट्या राज्यांमध्ये या लसीचा पुरवठा केलेला नाही. आतापर्यंत केंद्राकडून या लसीचे २५ लाख डोस उपलब्ध झाले आहेत.