अलिबाग : महाड तालुक्यातील खर्डी गावात महाड विभागीय कृषी अधिकारी आणि पुण्यातील वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या पाणलोट योजनेत सुमारे २६ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचाराचे प्रकरणी लोकशाही दिनात कार्यवाही करणे शक्य नसल्याने हे प्रकरण जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन सोमवारच्या लोकशाही दिनात लोकशाही दिनाचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी दिले. याबाबतची माहिती खर्डी पाणलोट विकास भ्रष्टाचाराचे बळी ठरलेले शेतकरी संदेश उदय महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.६ हजार ६६५ समतल चर (सीसीटी)चे काम दाखवून १० लाख ९६ हजार १६४ रुपये, २९१ छोटे दगडी बंधारे (एलबीएल)चे काम दाखवून ११ लाख ८६ हजार ६१९ रुपये तर नळ दुरुस्ती-पाइप लाइनचे काम दाखवून २ लाख ६४ हजार रुपये असे एकूण २५ लाख ४६ हजार ९८३ रुपये शासकीय निधी लाटून शेतकऱ्यांची फसवणूक करुन आर्थिक भ्रष्टाचार झाल्याबाबत महाडिक यांनी सोमवारी लोकशाही दिनात तक्रार दाखल केल्यावर शिंदे यांनी हे आश्वासन दिले आहे.संदेश महाडिक हे आपल्यावर व अन्य शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देत आहेत. महाड ग्रामीण पोलीस ठाणे येथे या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत परंतु सुमारे आठ महिन्यात तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. पोलिसांच्या उपस्थितीत पाणलोट बंधाऱ्यांच्या पंचनाम्याचे काम सुरू झाले मात्र शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी पंचनाम्यांचे काम थांबले ते अद्याप सुरू झाले नाही असे महाडिक म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
पाणलोट प्रकरण भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोर्टात
By admin | Updated: July 6, 2015 22:33 IST