Join us  

Mumbai Drug Case: नवाब मलिक यांना दणका, मोहित कंबोज यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने दिले अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला चालवण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 6:35 PM

Mumbai Drug Case: मुंबई ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खानच्या अटकेवरून Nawab Malik यांनी BJP नेते Mohit Kamboj आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात आरोपांची सरबत्ती केली होती. त्याविरोधात मोहित कंबोज यांनी कोर्टात धाव घेत

मुंबई - गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या मुंबई ड्रग्स केसला आता दररोज नवनवी वळणे लागत आहेत. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली असून, मलिक हे वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दररोज नवनवे आरोप करत आहेत. यादरम्यान, नवाब मलिक यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याविरोधातही आरोपांची सरबत्ती केली होती. त्याविरोधात मोहित कंबोज यांनी कोर्टात धाव घेत मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल व्हावा, अशी मागणी केली होती.

त्यावर सुनावणी करताना आज कोर्टाने नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज म्हणाले की, मी गेल्या महिन्यात महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नबाव मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदार खटला दाखल करण्यात यावा यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर मुंबईच्या महानगरदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाने आज महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीप्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. ९ ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर खोटे आरोप केले होते.

त्यामाध्यमातून आमची अब्रुनुकसानी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कुठलेही पुरावे नसताना त्यांनी माझ्याविरोधात आणि माझ्या कुटुंबीयांविरोधात आरोप करून आम्हाला लक्ष्य करण्याचा तसेच चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात मी कोर्टात दाद मागितली होती. तसेच मलिक यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यासाठी याचिका दिली होती. त्यावर गेल्या आठवड्यात कोर्टाने म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर आज कोर्टाने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. माझ्याविरोधात खोटे आरोप केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचे कोर्टाने यात नमूद केले आहे. तसेच नबाव मलिक यांच्याविरोधात खटला चालवला पाहिजे, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. मी न्यायाधीशांचे आभार मानतो. सत्य हे त्रस्त होऊ शकते मात्र पराभूत होऊ शकत नाही, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नबाव मलिक यांनी काल पुन्हा एकदा मोहित कंबोज यांना लक्ष्य केले होते. तसेच मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. तसेच या सर्व अपहरण नाट्यामागे मोहित कंबोज हे मास्टर माइंड असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्यानंतर हे आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावले होते. 

टॅग्स :नवाब मलिकमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीराजकारणन्यायालय