नवी मुंबई : आयसीएसई दहावी आणि आयसीएस बारावी बोर्डाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. देशात एकूण तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यात कोपखैरणेतील सेंट मेरी शाळेचा विद्यार्थी तेझान तपन साहूचा समावेश आहे. तेझान ९९ टक्के मिळवून देशाची शान ठरला आहे. तेझानला गणित, समाजशास्त्र या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळाले. ५०० पैकी ४९४ गुण मिळवून तेझानने नवी मुंबईचे नाव उज्ज्वल केले आहे. यापूर्वीही तेझानने गणित विषयातील ज्युनियर आॅलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश मिळविले होते. त्याच्या पालकांनी त्याचे कौतुक केले. ‘तेझानला त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळाले,’ या शब्दांत त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. निकाल कळताच सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे, मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, आमदार संदीप नाईक, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, बिशप वर्गिस मार कुरिलॉस, फादर अब्राहम जोसेफ, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सक्सेना, शाळेचे शिक्षकवृंद आदी मान्यवरांनी तेझानच्या यशाचे कौतुक केले. गेल्या पाच वर्षांत यंदाचा निकाल चांगला लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. (प्रतिनिधी)
तेझान ठरला देशाची शान
By admin | Updated: May 19, 2015 00:20 IST