Join us  

BMC मध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा; आमदार अमित साटमांचा सभागृहात गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 9:50 PM

BMC म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, १९९७ ते २०२२ या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेत या देशात सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

मुंबई - मुंबई महापालिका आयुक्तांच्या कॅबिनमध्ये संध्याकाळी ६ ते रात्री ९ या दरम्यान कोण कोण येते? हे सीसीटीव्हीत चेक करा. मुंबई महापालिकेच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट आयुक्त हे सध्याचे आहेत हे जबाबदारीने बोलतो. मुंबई शहराला लागलेली ही कीड आहे. अमेरिकेत कोण आहेत त्यांच्याकडे पार्सल जाते. हा मुंबईकरांचा टॅक्सचा पैसा आहे. कुणाच्या घरी जाण्यासाठी हा पैसा नाही याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई शहर, परंतु पायाभूत सुविधा त्या दर्जाच्या आहेत का? निवृत्त न्यायाधीशांमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. त्याचसोबत मुंबई महापालिकेचं ऑडिट करण्यात यावे अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केली. 

विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मुंबई, एमएमआर विभागातील समस्यांबाबत चर्चा आयोजित करण्यात आली होती. साटम म्हणाले की, BMC म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, १९९७ ते २०२२ या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेत या देशात सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोल स्कॅम, टू जी स्कॅम, पीडब्ल्यूडी स्कॅम हे काहीच नाही. ३ लाख कोटीहून अधिक घोटाळा या मुंबई महापालिकेत झाला आहे. रस्ते, शाळा, उद्यान इतकेच नाही तर भंगारातही घोटाळा झाला आहे. रेमडेशिवीर इंजेक्शनसाठी मुंबईकर जनता वणवण फिरत होती. त्या कोविड काळातही सत्ताधाऱ्यांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केला. २०२०-२०२२ या कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा कळस आहे. याठिकाणीही महापालिका आयुक्तांच्या रुपात सचिन वाझे बसलाय. वाझेगिरी करतात. अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त हे दोघे मिळून विरप्पन गँग चालवतात असा आरोप त्यांनी केला. 

तसेच काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर झोल झोल, बीएमसीवर भरवसा नाही का असं गाणं व्हायरल झालं होतं. मुंबईतील खरी समस्या प्रवासी वाहतूक, गृहनिर्माण हे आहेत. मुंबईतले रस्ते जगात प्रसिद्ध आहेत. १९९५ मध्ये SRA ची स्थापना झाली. १९९५-२०२२ या २७ वर्षात मुंबईत केवळ २ लाख २३ हजार युनिट्स शहरात तयार झाले. एसआरए, म्हाडाला भ्रष्टाचाराचा खूप मोठा विळखा लागला आहे असं साटम यांनी सांगितले. 

माजी मंत्री आदित्य ठाकरेंना टोलापर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोला विरोध करण्याचं पाप यांनी केले. बालहट्टामुळे मुंबईकरांच्या मेट्रोचं तिकीट जे १५ रुपयांना मिळणार होते ते २० रुपयांवर जाईल. कारण मेट्रो कारशेडचं काम थांबवल्यामुळे जवळपास हजारो कोटींनी प्रकल्प खर्च वाढला. पर्यावरणाचा ऱ्हास खऱ्या अर्थाने याच लोकांनी केला असं म्हणत भाजपा आमदार अमित साटम यांनी शिवसेनेला आणि आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. 

२०२१ मध्ये माझ्या मतदारसंघातील एसआरए प्रकल्पाच्या वादामुळे मी एसआरए कार्यालयात लोकांना घेऊन गेलो. लोक जेव्हा सीईओसमोर म्हणणं मांडत होते. तेव्हा ते अधिकारी म्हणाले तू कोण आहेस? गरिबांना घरं देण्याच्या निमित्ताने वसुली करायची होती. १९९९ ते २०१४ मुंबईत केवळ १ मेट्रो झाली. परंतु त्यानंतरच्या काळात २८६ किमी मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू झालं. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या शहरांना जोडणारी मेट्रो प्रकल्प काम सुरू झाले. आरेचे कारशेडचं काम थांबवून मेट्रो काम रखडवलं. मेट्रो प्रकल्पाला विरोध करून मुंबईच्या पर्यावरणाचा ऱ्हास खऱ्या अर्थाने यांनीच केला असा टोला अमित साटम यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंना लगावला.  

टॅग्स :अमित साटममुंबई महानगरपालिका