Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:06 IST

जयंत नारळीकर; शौर्य आणि समाजसेवा पुरस्कारांचे प्रदानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची गरज किती महत्त्वाची ...

जयंत नारळीकर; शौर्य आणि समाजसेवा पुरस्कारांचे प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची गरज किती महत्त्वाची आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले होते. ते धर्माभिमानी होते, मात्र धर्मांध नव्हते. विज्ञानाच्या चश्म्यातून पाहत त्यांनी धार्मिक रुढी-रिवाजांवर भाष्य केले, प्रसंगी टीका केली. विकसित देशांमध्ये विज्ञानावर मोठा भर दिला जातो, भारतामध्ये मात्र कृतीपेक्षा चर्चाच अधिक असून विज्ञानाबाबत असणारी ही उदासीनता देशाला आणि समाजालाही घातक आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी विज्ञानाचे महत्त्व नेहमीच अधाेरेखित केले. आजही त्यांच्या विज्ञाननिष्ठेची समाजाला गरज असल्याचे मत विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या २८ मे राेजीच्या १३८ व्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित ऑनलाइन पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नारळीकर बोलत होते. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार गलवान घाटीत चिनी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना हुतात्मा झालेले १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. तो पुरस्कार वीरपत्नी संतोषी संतोष बाबू यांनी स्वीकारला. १ लाख १ हजार एक रुपयांचा हा पुरस्कार आहे. यात स्मृतिचिन्ह, सावरकरांची प्रतिमा आणि मानपत्र यांचाही समावेश आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार हा पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीला देण्यात आला. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत जनकल्याण समितीचे कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये यांनी स्मारकाचे आभार मानले. कोरोना संसर्ग काळातील अतिशय महत्त्वाच्या आणि मोलाच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार जनकल्याण समितीला देण्यात आला.

कार्यक्रमात सुरुवातीला सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांचे सावरकरांच्या विचारांवर, हिंदुत्वावर आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत भाषण झाले. स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी गलवान घाटी, गेल्या वर्षी चिनी सैनिकांनी केलेल्या आक्रमणाचे रूप, चिनी आक्रमणे याबाबत माहिती दिली. तसेच निवृत्त लेफ्टनंट जनरल अश्विनीकुमार बक्षी यांनी हुतात्मा संतोष बाबू यांच्या १६ बिहार रेजिमेंटबद्दल माहिती दिली. मंजिरी मराठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन केले. समारंभाच्या अखेरीस स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी स्मारकाच्या कार्याची व पुरस्कारांची माहिती दिली.

...................................................