Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर, मुरबाडच्या आठ जागांची आज मतमोजणी

By admin | Updated: January 29, 2015 23:22 IST

ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या ५५ गट आणि ११० गणांपैकी अवघ्या चार गट तसेच चार गणांसाठी १० टक्के मतदान झाले.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या ५५ गट आणि ११० गणांपैकी अवघ्या चार गट तसेच चार गणांसाठी १० टक्के मतदान झाले. त्या जागांची मतमोजणी उद्या (शुक्रवारी) होणार आहे. शहापूरची मतमोजणी वनरक्षक प्रशिक्षण विद्यालय, आग्रा रोड आणि मुरबाड येथील मतमोजणी संत ज्ञानेश्वर खुले सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे होणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या जवळपास सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा उमेदवारांची, तर पंचायत समितीच्या चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे बुधवारी शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील चार जिल्हा परिषदेच्या व चार पंचायत समितीच्या जागांसाठी निरुत्साही मतदान झाले. या जागांचा निकाल काही तासांतच लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मात्र, या निकालानंतर निवडणूक आयोग ठाणे जिल्हा परिषदेसाठी पुन्हा सार्वत्रिक निवडणूक घेतो की पोटनिवडणूक, याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे़ ग्रामपालिका, नगरपालिका आणि महापालिकांच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत सर्वपक्षीयांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे अवघे चार गट आणि चार गणांतच ही निवडणूक झाली़ यातही निवडून आल्यावर या चार गट, गणांतील काही सदस्य राजीनामे देणार असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)