राजू काळे, भार्इंदरराज्यातील विविध जिल्हा-तालुक्यांसह मीरा-भार्इंदर शहरात बनावट रिक्षा बॅज व लायसन्स सर्रास तयार केले जात असून ते प्रत्येकी ३० ते ४० हजार रुपयांना खुलेआम विकले जात आहेत. राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागासंबंधीचे (आरटीओ) सर्व परवाने आॅनलाइन केल्यानंतर जनता व विभाग यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या एजंटना महिनाभरापासून पूर्णत: बंदी घातली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो आरटीओ एजंटांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे नागरिकांनी मात्र विभागाच्या आॅनलाइन कार्यप्रणालीला पसंती दिली आहे. असे असले तरी या विभागात प्रत्येक कामासाठी मूळ व्यक्तीला हेलपाटे मारून आपले काम करून घ्यावे लागणार आहे. पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या आॅनलाइन संकल्पनेला विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून चतुराईने बगल देऊन आपले हित साधले जाण्याची शक्यता याच विभागातील कर्मचारी वर्तवित आहेत. याचा प्रत्यय मीरा-भार्इंदर शहरांत येत आहे. काही मोटार ट्रेनिंग स्कूलच्या आडून रिक्षाचालकांना बनावट बॅज व लायसन्स प्रत्येकी ३० ते ४० हजारांना विकले जात आहेत. यापूर्वीही २६ जानेवारी व १६, २९ जून २०१२ रोजी काही कर्तव्यदक्ष वाहतूक कर्मचाऱ्यांमुळे शहरातील बोगस बॅज प्रकरण उघडकीस आले होते. या कारवाईत सुमारे ५० हून अधिक रिक्षाचालकांना व ड्रायव्हींग ट्रेनिंग स्कूलमध्ये बनावट बॅज तयार करणाऱ्या टोळक्यांना गजाआड करण्यात आले होते. हा प्रकार आजही शहरासह राज्यातील विविध जिल्हा व तालुक्यांच्या ठिकाणी सुरू असल्याचे काही जुन्या आरटीओ एजंटकडून सांगण्यात येत आहे.
बनावट रिक्षा बॅज, लायसन्सचा सुळसुळाट
By admin | Updated: February 8, 2015 22:54 IST