Join us
Daily Top 2Weekly Top 5

केईएम रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनानंतर वाढीस लागलेल्या म्युकरमायकोसिसमुळे अनेकांना दृष्टी गमवावी लागल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयात मे ...

मुंबई : कोरोनानंतर वाढीस लागलेल्या म्युकरमायकोसिसमुळे अनेकांना दृष्टी गमवावी लागल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयात मे महिन्याच्या अखेरीस रुग्णालय प्रशासनाने विशेष समुपदेशन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या विभागात आतापर्यंत १२२ रुग्णांवर उपचार केले असून ९७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

केईएम रुग्णालयात ६० खाटा म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी राखीव आहेत. कोरोनामुक्तीनंतर या संसर्गामुळे दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या समुपदेशन विभागात रुग्णांच्या नातेवाईक वा कुटुंबीयांचे डॉक्टरांकडून समुपदेशन करण्यात येत आहे. यावेळेस रुग्णांना पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक विचार व संवाद साधण्यात येतो. याविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, शरीराचा एखादा अवयव अचानकपणे निकामी होणे हे रुग्णासाठी मानसिकरीत्या धक्कादायक असू शकते. त्यामुळे अशा स्थितीत रुग्णांना नव्हे तर कुटुंबीयांनाही नव्याने येणाऱ्या अपंगत्वाविषयी समुपदेशित करावे लागते. या विभागात आठ मानसोपचारतज्ज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. शस्त्रक्रियेपूर्वीही रुग्णांना समुपदेशनाची गरज भासते आहे.

राज्यात आतापर्यंत ७ हजार म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार कऱण्यात आले असून आतापर्यंत ६०० रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. ब्लॅकफंगसमुळे मुंबईत तीन मुलांचे डोळे काढण्यात आले आहेत. ही सर्व मुले ४ ते १६ वयोगटातील आहेत. यासंदर्भात बोलताना, डॉ. जेसल शाह यांनी सांगितले की, 'यावर्षी त्यांच्याकडे दोन ब्लॅकफंगस आजाराचे रुग्ण दाखल झाले. हे दोन्ही रुग्ण अल्‍पवयीन होते. यातल्या १४ वर्षीय मुलीला मधुमेहाची लागण झाली होती. यातील एक मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत तिचे डोळे काळसर झाल होते. ब्लॅकफंगस नाक, सायनस, डोळ्यापर्यंत व्यापले होते. त्यामुळे या मुलीचा डोळा काढावा लागला. यावेळी एका १६ वर्षीय मुलीवरदेखील उपचार करण्यात आले. या मुलीच्या पोटापर्यंत काळीबुरशी पसरली होती. त्यानंतर या मुलीवर उपचार करण्यात आले, तसेच एका खासगी रुग्णालयामध्ये चार आणि सहा वर्षाच्या लहान वयोगटातील रुग्णांना ब्लॅकफंगस झाल्याचे समोर आले होते.