सुशांत मोरे, मुंबईमुंबई शहर व उपनगरीय मार्गावर एमयूटीपी-२ अंतर्गत सुरू असलेले आणि होणारे अनेक रेल्वे प्रकल्प विविध कारणास्तव रखडल्याने एमआरव्हीसीला आर्थिक फटका बसला आहे. एमयूटीपी-२मधील प्रकल्पांच्या खर्चात २,७00 कोटींची वाढ झाली असून, त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यात आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. एमयूटीपी-२ प्रकल्प २00८-0९ साली रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला. या प्रकल्पात सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, हार्बरवर अंधेरीपासून गोरेगावपर्यंतचा विस्तार, डीसी ते एसी परावर्तन, बारा डबा लोकलसाठी स्थानकांचा विस्तार, त्यासाठी लागणारे डबे, बम्बार्डियर लोकल, स्थानकांचा विकास आणि रूळ ओलांडणे रोखण्याच्या प्रकल्पासह अन्य प्रकल्पांचा यात समावेश होता. या प्रकल्पाला मंजुरी देताना त्याची किंमत ही ५ हजार ३00 कोटी रुपये एवढी होती. मात्र यातील प्रकल्प पूर्ण करताना एमआरव्हीसीच्या नाकीनऊ येत आहेत. जमिनी ताब्यात घेताना स्थानिकांचा होणारा विरोध, लागणारे साहित्य व साधनांच्या किमतीत झालेली वाढ अशा अनेक कारणांमुळे सुरू झालेले व यापुढे होणाऱ्या प्रकल्पांना उशीर होत गेला आणि त्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ होत गेल्याचे एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. यात सर्वांत मोठा फटका हा प्रकल्पाचे काम अद्यापही सुरू न झालेल्या सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाला बसला आहे. या प्रकल्पाची किंमत ही अगोदर ६५९ कोटी रुपये एवढी होती. यात आणखी ३00 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मुंबई सेंट्रल ते बोरीवली ६व्या मार्गासाठीचा खर्च ५२२ कोटी रुपयांवरून सुमारे ५७७ कोटींवर गेला आहे.
एमयूटीपी-२ प्रकल्पांचा खर्च २,७00 कोटींनी वाढला
By admin | Updated: November 25, 2015 03:15 IST