Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी - संजय निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदारांनी मागच्या काही वर्षांत, दशकात अमाप माया गोळा केली. अवैध संपत्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदारांनी मागच्या काही वर्षांत, दशकात अमाप माया गोळा केली. अवैध संपत्ती निर्माण केली. या सर्वांची कधीतरी चौकशी व्हायलाच हवी, अशा शब्दात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाकडून केलेल्या कारवाईचे एक प्रकारे समर्थन केले.

ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज ईडीने धाडी टाकत तपास सुरू केला. ईडीची कारवाई राजकीय सूडबुद्धीचा परिणाम असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. मात्र, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडत कारवाईचे समर्थन केले. प्रताप सरनाईक यांनी नेमके काय केले याची मला कल्पना नाही. चौकशीतून सत्य बाहेर येईलच, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणून हिणवले. पण, या सर्व काळात स्वतःच्या अवतीभोवती काय सुरू आहे, हे पाहायला ते विसरले. त्यांच्याच शिवसेना नेत्यांनी किती मोठाले भ्रष्टाचार केले, मुंबई महापालिका तर भ्रष्टाचाराचा अड्डा बनली. या भ्रष्टाचाराची सगळी कमाई शिवसेना नेत्यांच्या खिशात, घरात जमा झाली. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी होणे आवश्यक आहे. जर, राजकीय सूडभावना नसेल तर भ्रष्टाचाराविरोधातील अशा कारवायांना विरोध होता कामा नये, असे निरुपम म्हणाले.