Join us

सीईटी अर्जात करता येणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदा अकरावी प्रवेशासाठी पहिल्यांदाच सीईटी परीक्षेचे आयोजन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदा अकरावी प्रवेशासाठी पहिल्यांदाच सीईटी परीक्षेचे आयोजन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पर्याय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणी अर्धवट राहिली आहे. मात्र आता त्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्तीचा पर्याय देण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून त्यासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून अर्ज नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २ ऑगस्ट रात्री ११.५९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सीईटी अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून केंद्र निवडताना, परीक्षेचे माध्यम निवडताना घोळ होत आहे. मात्र चुकीची दुरुस्ती करण्यासाठी पर्याय नसल्याने विद्यार्थी, पालकांचा गोंधळ उडत होता. यासंबंधी ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘परीक्षा केंद्र निवडताना विद्यार्थ्यांचा होतोय घोळ’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त आणि पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य शिक्षण मंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी या सुविधेच्या माध्यमातून ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक, परीक्षेचे माध्यम, निवासस्थानाचा पत्ता, तालुका, केंद्र, प्रवर्ग यामध्ये दुरुस्ती करू शकणार आहेत.

अनेक विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांनी एकच अर्ज ठेवून बाकीचे अर्ज डीलीट करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. यासाठीची सुविधा १ ऑगस्ट सकाळी ११ पासून २ ऑगस्टपर्यंत उपलब्ध आहे.

शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १० लाख ९१ हजार ०२१ विद्यार्थ्यांनी राज्यभरातून सीईटी अर्जाची नोंदणी केल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.