वसई : या प्रभागातील आचोळेडोंगरी, आंबेडकरनगर व आचोळे रस्त्याच्या पूर्व बाजूचा संपूर्ण परिसर याचा या प्रभागात समावेश आहे. गेल्या काही वर्षात या प्रभागातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या.या इमारतींना महानगरपालिकेच्या नागरी सुविधा मिळू शकत नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण नागरीक हवालदिल झाला आहे. या इमारती एकमेकांस खेटून बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे विकासकामे करतानाही महानगरपालिका प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. दैनंदिन साफसफाई, वैद्यकीय सेवा व अन्य सोयीसुविधा देणे शक्य होत नाही.या प्रभागातून बहुजन विकास आघाडीचे रुपेश जाधव निवडुन आले आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना उपमहापौरपद मिळाले. सुमारे १२ ते १३ कोटी रू. चा आर्थिक निधी विकासकामांसाठी मिळाला तो खर्चही करण्यात आला परंतु प्रभागातील बकालपणा मात्र नाहीसा होऊ शकलेला नाही. दैनंदिन कचरा उचलणे या कामामध्ये प्रचंड दिरंगाई होत असते त्यामुळे अनेक भागात कचरा साचलेला पहावयास मिळतो. पाण्याची समस्याही दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. ऐन उन्हाळ्यात येथील रहिवाशांना पाण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागतात. पाणीटंचाई व लोकांची गरज लक्षात घेऊन टँकरवालेही आपल्या टँकरचे दर अव्वाच्या सव्वा वाढवत असतात. रस्ते, गटारे व पेव्हरब्लॉक बसवणे इ. कामे गेल्या साडेचार वर्षात करण्यात आली. या प्रभागामध्ये सर्वाधिक महत्वाचा प्रश्न म्हणजे अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही.
अनधिकृत बांधकामांकडे नगरसेवकाचे दुर्लक्ष
By admin | Updated: February 12, 2015 22:50 IST