Join us
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी दोन अभियंत्यांना कोंडले

By admin | Updated: July 4, 2015 03:28 IST

रस्त्यांची दूरवस्था आणि त्यावर प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे संतापलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी जी दक्षिण प्रभाग समितीच्या कार्यालयात आज चक्क दोन अभियंत्यांना कोंडून ठेवले़

मुंबई : रस्त्यांची दूरवस्था आणि त्यावर प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे संतापलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी जी दक्षिण प्रभाग समितीच्या कार्यालयात आज चक्क दोन अभियंत्यांना कोंडून ठेवले़ अखेर अतिरिक्त आयुक्तांनी मध्यस्थी करीत रस्त्यांच्या तक्रारी दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चार तासांनी या अभियंत्यांची सुटका करण्यात आली़मान्सूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यांची दूरवस्था झाली आहे़ जी दक्षिण विभाग म्हणजे मध्य मुंबईतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय स्थिती झाली आहे. याचा जाब सर्वपक्षीय सदस्यांनी जी दक्षिण प्रभाग समितीच्या बैठकीत आज अभियंत्यांना विचारला़ यावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने रस्ते विभागाचे उपप्रमुख अभियंता संजय दराडे व साहाय्यक अभियंता सुनील जैन यांना नगरसेवकांनी बैठकीच्या कार्यालयातच डांबून ठेवले़ प्रभाग समितीच्या बैठकीत चार तास सुरू असलेल्या नाट्याची अखेर अतिरिक्त आयुक्त एस़ व्ही़ आऱ श्रीनिवास यांच्या मध्यस्थीनंतर झाली़ नगरसेवक माघार घेत नसल्याने श्रीनिवास यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले़ त्यानुसार रस्त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आपल्या दालनात लवकरच बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केल्यानंतर या अभियंत्यांची सुटका झाली़ (प्रतिनिधी)