पनवेल : विषय समिती सभापतीपदाच्या नियुक्त्या मंगळवारी झाल्या. यावेळी काही नगरसेवकांनी आकांडतांडव केले, मात्र गटनेत्यांनी दिलेल्या यादीनुसारच पुढील वर्षासाठी नवीन सभासद निवडण्यात आले. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या मर्जीतील व्यक्तींना पदावर बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र गटनेत्याला अधिकार असल्याने त्यांचे काहीच चालले नाही. शिवसेनेनेही वेगळ््या गटाचा मुद्दा मांडून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली, मात्र पीठासीन अधिकाऱ्याने ती फेटाळत नियुक्त्या जाहीर केल्या. यावरून पालिकेत काँग्रेसच्या चाव्या भाजपकडे आणि भगव्याच्या किल्ल्या लाल बावट्याकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. टोलचा प्रश्न मार्गी लावला नाही म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांनी समर्थकांसह काँग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतले. रामशेठ म्हणजेच काँग्रेस पक्ष होता हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. ठाकूर यांच्याबरोबर २१ पैकी १६ नगरसेवक असून उर्वरीत पाच फक्त काँग्रेससोबत असल्याचा त्यांचा दावा आहे.त्या १६ जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला नसला तरी निवडणुकीत उघड उघड कमळ हातात घेतले होते. डोअर टु डोअर जाऊन सर्वांनी आपल्या नेत्याचा प्रचार केला होता, तेही कोणत्याही कारवाईला न जुमनता. परिणामी काँग्रेसच्या आर. सी. घरत यांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचा आदेश अंतिम असल्याचा प्रत्यय विषय समितीच्या निवडणुकीत आला. आर. सी. घरत यांनी नगराध्यक्ष चारूशीला घरत व गटनेते अनिल भगत यांना बोलावून पक्षाचा आदेश पाळण्याची तंबी दिली होती, मात्र हा आदेश भगत यांनी धुडकावून लावला आणि ठाकूर यांच्याकडून आलेली यादी पीठासन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. शिफारसीनुसार नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. २०११ च्या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक २१ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी सर्व नगरसेवकांनी अनिल भगत यांची गटनेता म्हणून निवड केली, तशी नोंदणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेकाप- शिवसेना यांची अधिकृत युती म्हणून जिल्हाधिकारऱ्यांकडे नोंद आहे. यावेळी संदीप पाटील यांची गटनेते म्हणून निवड जाहीर करण्यात आली आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.
पालिकेत काँग्रेसच्या चाव्या भाजपाकडे
By admin | Updated: December 26, 2014 00:06 IST