Join us  

CoronaVirus News: स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 3:06 AM

कोरोनाची साथ पूर्ण संपलेली नाही. पुढील किमान सहा महिने आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक दुकाने उघडली आहेत. किराणा, कपडे, दागिने अशा अनेक ठिकाणी स्त्रिया निवांत खरेदी करत असताना दिसत आहेत; मात्र कोरोनाची साथ पूर्ण संपलेली नाही. पुढील किमान सहा महिने आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. प्रतिबंधक उपायांचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे, गर्दीच्या ठिकाणावरून लवकरात लवकर काम संपवून काढता पाय घेणे. घरातील महत्त्वाच्या गोष्टींच्या खरेदीची जबाबदारी गृहिणींवर असते. या वस्तू खरेदी करताना, तसेच कपड्यांसारख्या इतर गोष्टी खरेदी करताना पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त वेळ लावतात. स्त्रिया हे मुद्दाम करत नसतात. याला काही मानसशास्त्रीय कारणे असतात. स्त्रियांचा टेम्पोरल व परायटल लोब हा मेंदूचा भाग पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतो. त्यामुळे रंग, हाताला लागणारी संवेदना, वास, एखाद्या वस्तूतील विविधता हे स्त्रियांना लवकर कळते व त्याविषयी त्या जास्त जागरूक असतात. कुठल्याही वस्तूच्या खोलात जाऊन ती गोष्ट पाहणे हा स्त्रियांच्या मेंदूचा गुणधर्म असतो. कुठलीही खरेदी करताना त्या जास्त चौकस असल्याने त्यांना खरेदी करताना निर्णय घेण्यास वेळ लागतो. ही गोष्ट कोरोनाच्या या साथीच्या काळात तापदायक ठरू शकते. याचे कारण कोरोनाची लागण तुमच्या संपर्कापेक्षा किती वेळ संपर्क येतो यावर अवलंबून असते. म्हणूनच स्त्रियांना या सवयीला काही काळ तरी मुरड घालायला हवी. यासाठी पुढील गोष्टी पाळाव्या.खरेदीला जातानाच आपल्याला दुकानाच्या आत जाण्याची व बाहेर येण्याची वेळ निश्चित करून घ्यावी. हा वेळ अर्ध्या तासापेक्षा कमी असावा.कुठल्याही ठिकाणी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवल्यास जोखीम वाढते.काय खरेदी करायचे आहे हे यादी करून आधीच ठरवून ठेवावे.कपड्यांसारख्या गोष्टींची छायाचित्रे बघण्यासाठी मोबाइलवर मागवून घ्यावी.शक्य होईल तेव्हा मोबाइलद्वारे ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करावी.दुकानांनी त्यांच्या संकेतस्थळावर थ्री-डी गॅलरी तयार करून वस्तू / कपडे सर्व बाजूंनी बघता येतील अशी सोय करावी म्हणजे ग्राहक घरी बघून काय खरेदी करायचे आहे हा निर्णय दुकानात येण्याआधीच नक्की करू शकतील.छोट्या गावांमध्येही फोन नंबर देऊन स्थानिक पातळीवर वस्तू घरपोच देण्याची सोय करावी.- डॉ. अमोल अन्नदाते, (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या