Join us  

Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंट हातपाय पसरतोय मग बूस्टर डोस देण्यात अडचण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 8:15 AM

सिरम इन्स्टिट्यूट, मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य शासन अशा सर्व घटकांकडून केंद्र शासनाकडे बूस्टर डोसला संमती देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

मुंबई : ‘ओमायक्रॉन’ हा व्हेरिएंट जगभरात हातपाय पसरताना दिसून येतोय. त्यामुळे बूस्टर डोसबाबतही सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची चर्चा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, सोमवारी दिल्लीत झालेल्या बूस्टर डोस संबंधीच्या बैठकीत वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये याविषयी मतमतांतरे झाली आहेत. परिणामी, बूस्टर डोसचे धोरण अजूनही शासकीय दरबारी प्रलंबित आहे.

यांनी केली बूस्टर देण्याची मागणीकोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट, मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य शासन अशा सर्व घटकांकडून केंद्र शासनाकडे बूस्टर डोसला संमती देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

काय म्हणतात तज्ज्ञ...याविषयी राज्य व राष्ट्रीय कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, की बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे. परंतु, अजूनही देशातील लसीकरण मोहीम पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लसीच्या उपलब्धतेचाही प्रश्न आहे. तसेच आधी लसीकरण मोहीम पूर्ण करून मगच बूस्टरविषयी धोरण जाहीर करण्यात येईल, अशी आशा आहे. 

...ही आहेत कारणे केंद्रीय वैद्यकीयतज्ज्ञ आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाने बूस्टर डोसला हिरवा कंदिल देण्यासाठी अजूनही शास्त्रीय वैज्ञानिक संशोधित पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊनही योग्य प्रतिकारकशक्ती निर्माण न झालेल्यांना अतिरिक्त डोस देणे किंवा दोन डोस पूर्ण झाल्यानंतर ठराविक मुदतीत बूस्टर डोस देणे हे दोन पर्याय वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले होते. परंतु, याविषयी अजूनही स्पष्टता नाही.

‘कोरोना योद्ध्यांना तिसऱ्या डोसची परवानगी द्या’

महाराष्ट्रासह ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठीची वयोमर्यादा १८ वरून १५ वर्षे करावी आणि कोविड योद्ध्यांना कोरोना लसीची तिसरी मात्रा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोविड योद्ध्यांना कोविड प्रतिबंधक तिसरी लस घेण्याची परवानगी द्यावी. तसेच १४ ते १८ या वयोगटातील मुलांची शारीरिक घडण साधारणपणे सारखी असते. त्यामुळे वयोमर्यादा कमी केल्यास उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोना संरक्षण कवच पुरवता येईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :कोरोनाची लसओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्या