Join us  

CoronaVirus News: उभ्याने प्रवास, गर्दी टाळण्यासाठी ‘बेस्ट’ सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 1:58 AM

बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांनी दररोज सुमारे २२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मधल्या काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेस्ट बसमधील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

मुंबई : लॉकडाऊन असो किंवा संचारबंदी प्रत्येक आपत्ती काळात बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेअंतर्गत बस गाड्यांमध्ये गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास बंद करण्यात आले आहे. याबाबतची सूचना सर्व वाहन चालक व वाहकांना करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांनी दररोज सुमारे २२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मधल्या काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेस्ट बसमधील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गर्दीच्या वेळी बसगाड्या प्रवाशांनी खचाखच भरून जात होत्या. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजले होते. मात्र नवीन निर्बंध लागू झाल्याने बेस्टच्या काही बस आगाराबाहेर सूचना फलक लावून वाहन चालक व वाहकांना कोणती खबरदारी घ्यावी, हे कळविण्यात आले आहे.त्यानुसार बेस्ट बस गाड्यांमध्ये आसन व्यवस्थेनुसार प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार आहे. उभ्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवास करता येणार नाही. याची खबरदारी घेण्याची सूचना वाहकांना करण्यात आली आहे. तसेच बेस्टचे पथक गर्दीच्या वेळी बस थांब्यावर उभे राहून बस गाड्यांवर लक्ष ठेवतील. बसमध्ये गर्दी होऊ नये आणि लोकांना ताटकळत राहावे लागू नये, याची खबरदारी हे पथक घेणार आहे. मात्र भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसगाड्या खासगी ठेकेदाराच्या असल्याने हे नियम तेथे पाळले जाणार का? याबाबत बेस्टचे कर्मचारी शंका व्यक्त करत आहेत.

टॅग्स :बेस्ट