Join us  

CoronaVirus News : दहा टक्के रुग्णांवर पोस्ट ओपीडीत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 6:22 AM

फुप्फुसावर परिणाम झालेल्यांपैकी ५० टक्के कोरोना रुग्णांना श्वसनाचे विकार होत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

मुंबई : सध्या एकूण रुग्णांपैकी सुमारे १० टक्के रुग्णांना पोस्ट कोविड आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.कोरोना हा श्वसनाचा आजार आहे. याचे विषाणू नाकातून, तोंडातून शरीरात गेल्यानंतर ते सर्वात आधी फुप्फुसावर हल्ला करतात. त्यामुळे त्याचा फुप्फुसावर परिणाम होतो. तर कोरोनाचा आजार बळावल्यानंतर विषाणू फुप्फुसाबरोबर मूत्रपिंड, यकृतावर परिणाम करत आहे. यात अतिजोखमीच्या गटातील ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या संसर्गामुळे मृत्युदर वाढत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. रुग्ण कोरोनामुक्त झाले तरी काही दिवसांनी त्यांना इतर आजार जडत आहेत. त्यात मुख्यत्वे श्वसनाचे विकार आहेत.फुप्फुसावर परिणाम झालेल्यांपैकी ५० टक्के कोरोना रुग्णांना श्वसनाचे विकार होत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. या रुग्णांना घरीही आॅक्सिजनची गरज पडत असून यातील काही रुग्णांना तर कायमस्वरूपी आॅक्सिजनची गरज पडत आहे. तर पन्नासच्या आतील ८० टक्के रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. पण त्याच वेळी २० टक्के रुग्णांना कायम अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी असे त्रास जाणवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाचे आजार आहेत त्यांच्यात कोरोनामुक्तीनंतर हे आजार आणखी वाढत आहेत, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी जवळपास १० टक्के कोरोनामुक्त रुग्ण पोस्ट कोविड आजाराचे शिकार होत असल्याचे सांगितले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे. कोरोनाचे विषाणू विविध अवयवांवरच थेट हल्ला करतात. त्यामुळे अवयवांना मोठ्या प्रमाणावर इजा होते. मग साहजिकच त्यातून इजा झालेल्या अवयवांचे आजार जडत आहेत. दुसरे कारण कोरोना उपचारांसाठी विविध औषधे-इंजेक्शन रुग्णांना द्यावी लागत आहेत. अनेकदा या औषधांचेही दुष्परिणाम अवयवांवर होऊन पोस्ट कोविड आजार बळावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस