Join us  

CoronaVirus News: ...म्हणून कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक; समोर आलं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 4:36 AM

शहर, उपनगरातील अनेक रुग्णालय वा जम्बो कोविड केंद्रांमध्ये संसर्गाची बाधा सामूहिक स्वरूपात झाली आहे. त्यामुळे याचा धोका अधिक आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. यात आणखी भीषण बाब म्हणजे, शहर, उपनगरातील अनेक रुग्णालय वा जम्बो कोविड केंद्रांमध्ये संसर्गाची बाधा सामूहिक स्वरूपात झाली आहे. त्यामुळे याचा धोका अधिक आहे.गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रात नुकतेच जवळपास ४९ बांधकाम मजुरांवर उपचार करण्यात आले. हे मजूर मेट्रोच्या साइटवर काम करणारे होते. तर महालक्ष्मी येथे एका फ्लॅटचे काम कऱणाऱ्या १३ कामगारांना कोरोनाची लागण झाली, ज्या कुटुंबीयांचा हा फ्लॅट होता तेही संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होते अशी माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी दिली. यानंतर आणखी लग्नसोहळ्यात १६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र वेळेवर निदान झाल्याने त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाल्याची माहिती डॉ. आंद्राडे यांनी दिली आहे.माझगाव येथील रिचर्डसन येथील कोविड केंद्रावर शासकीय दंत महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांवर कोरोनावरील उपचार करण्यात आले. केंद्रातील डॉ. मयुरी फुलपगार यांनी सांगितले, हे सगळे विद्यार्थी रुग्णालयात मेस, प्रसाधनगृह आणि एकाच प्रांगणात वावरत होती. त्यामुळे एकाच वेळी कोरोनाची लागण झाली. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ४० टक्के रुग्ण भरती सामूहिक संसर्गाची असल्याचे दिसून आले. सध्या १६५० खाटा आरक्षित आहेत, यातील ६०० हून अधिक कौटुंबिक सदस्य आहेत. मागील काही दिवसांत कौटुंबिक सामूहिक संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता तरी कोरोनाविषयी बेफिकिरी सोडून नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन कऱणे गरजेचे आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या