Join us  

CoronaVirus News: मुंबईतून गावी जाण्याची धावपळ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 4:12 AM

​​​​​​​गर्दीला टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनामुळे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे. मुंबईतून गावी परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. जागा आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या खासगी बस गाड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी उत्तर भारतातील काही राज्यांत जाणाऱ्या बस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाली आहे.नव्याने लागू झालेल्या कठोर निर्बंधांमुळे परराज्यातील कामगारांनी पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू केला आहे. सध्या रेल्वेमधून मर्यादित प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. आरक्षित जागेव्यतिरिक्त अतिरिक्त प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे आता खासगी बस गाड्यांकडे लोक वळत आहेत. त्यामुळे खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दरही वाढवण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडे विचारणा होताना दिसत आहे. गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी गुजरातमध्ये जाणारे प्रवासी राजस्थानमध्ये जात आहेत. तेथून गुजरातमध्ये जाण्याचा मार्ग निवडत आहेत.गर्दीला टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंदलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढत आहे. रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल यासह तर पश्चिम रेल्वेने सर्व रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या