Join us  

Coronavirus: मुंबईची आरोग्य यंत्रणा राज्य शासनाने ताब्यात घ्यावी; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 3:27 AM

कोरोना रुग्णांसाठी बेड नाही, क्वारंटाइन सेंटरला सुविधांचा अभाव असून रुग्णांना पाणी, न्याहारी व जेवण वेळेवर मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्या आहेत.

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या कालपर्यंत ३७,२५७ होती, तर ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ७,८१२ इतकी असून २१५ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत असून याला आळा घालण्यात देशातील सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिका सर्व आघाडीवर अपयशी ठरली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मुंबईची आरोग्य यंत्रणा मुंबई महापालिकेकडून राज्य शासनाने ताब्यात घ्यावी, अशी आग्रही मागणी वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आज पश्चिम उपनगरातला सर्वात मोठा रेड झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के पश्चिम वॉर्डमध्ये कालपर्यंत ५२३ कोरोना रुग्ण होते, तर हॉटस्पॉट असलेल्या वेसावे कोळीवाड्यात ५५ कोरोना रुग्ण असून रोज येथील रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील कोळीवाडे व मोठ्या प्रमाणात असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी खास टास्क फोर्स आराखडा राबवण्याची आणि मुंबईकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी आपण शासनाला केली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

त्या म्हणाल्या, वर्सोवा मतदारसंघाचा विचार केला, तर कोरोना रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नाहीत. गेल्या आठवड्यात वेसावे कोळीवाड्यातील ९ कोरोना रुग्णांचे तर खूप हाल झाले. फक्त दोन अ‍ॅम्ब्युलन्सच उपलब्ध होत्या. तर गेल्या गुरुवारी येथील ५८ वर्षीय कोरोना रुग्ण महिलेला दिवसभर अ‍ॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. रात्री १२ वाजता कुठे अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली. सदर महिला चार हॉस्पिटल फिरून आली, मात्र बेड नसल्याने ती पुन्हा मध्यरात्री ३ वाजता घरी आली. दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली, मात्र यावेळी तिला अंधेरी (पूर्व) येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या दारात ३ तास अ‍ॅम्ब्युलन्समध्ये थांबावे लागले.कोरोना रुग्णांसाठी बेड नाही, क्वारंटाइन सेंटरला सुविधांचा अभाव असून रुग्णांना पाणी, न्याहारी व जेवण वेळेवर मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्या आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे दाद मागूनसुद्धा समस्यांचे निराकरण होत नाही. त्यामुळे मुंबईत कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईची आरोग्य यंत्रणा मुंबई महापालिकेकडून राज्य शासनाने ताब्यात घ्यावी, अशी लव्हेकर यांची मागणी आहे़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका