Join us  

CoronaVirus News: आप्त बनून २० हून अधिक कोरोनाबाधितांना दिला मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:30 AM

स्मशान परिचराची माणुसकी; संसर्ग झाल्याने मरण आल्यानंतर जवळचेही झाले लांब, तेव्हा स्वीकारली अंत्यसंस्काराची जबाबदारी

- मनीषा म्हात्रे मुंबई : कोरोनाच्या संकटात जेव्हा जवळचेही दूर झाले तेव्हा टाटा कॉलनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या विलास ऐमेकर यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा कधी मुलगा, बाप, तर कधी आई बनून अग्नी दिला. त्यांनी आतापर्यंत २० हून अधिक कोरोनाबाधित मृतदेहांना अग्नी देऊन समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवला आहे.ठाकुर्लीत पत्नी आणि अवघ्या ८ व १४ वर्षांच्या दोन मुलांसोबत राहत असलेले ऐमेकर हे गेल्या ८ वर्षांपासून मुंबई महापालिकेत स्मशान परिचर म्हणून नोकरी करतात. सुरुवातीची ६ वर्षे अंधेरी स्मशानभूमीत त्यांनी सेवा बजावली. गेल्या दोन वर्षांपासून ते मुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनीतील पालिकेच्या संयुक्त स्मशानभूमीत सेवा बजावत आहेत. या आठ वर्षांच्या कार्यकाळात हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे ऐमेकर यांचे कोरोना काळातही न घाबरता अविरत कार्य सुरू आहे.ऐमेकर सांगतात, मी एक दिवस घरी राहिलो तर मृतदेह कोण जाळणार? म्हणूनच कोरोनाच्या काळातही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या कार्यात मी एकही दिवस खंड पडू दिला नाही. कोरोना महामारीच्या मुंबईतील सुरुवातीच्या हाहाकारात पोटच्या दोन चिमुकल्या मुलांना आणि पत्नीला पालिका कार्यालयात काम करतो, असे खोटे सांगून घराबाहेर पडावे लागायचे. त्यात स्वत:चे वाहन नसल्याने स्वत:ची काळजी घेत डोंबिवलीवरून बस पकडण्यासाठी ठाकुर्ली येथून डोंबिवली स्टेशनपर्यंत पायपीट करून त्यानंतर बसने मुलुंड गाठावे लागत असे. बस चुकू नये म्हणून घरातून दोन तास आधीच बाहेर पडत असे. मुलुंड पश्चिमेकडील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद असल्याने तेथे वाढणारा ताण लक्षात घेता टाटा कॉलनी स्मशानभूमीत मृतदेह जाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. कोरोनाच्या धास्तीने अनेक नातेवाईक मृतदेह स्मशानभूमीबाहेरच ठेवून कागदपत्रांची पूर्तता करत लांब उभे राहतात. सरणाशेजारी जायला धजावत नाहीत. अशा वेळी ऐमेकर स्वत: पुढाकार घेत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. अशीच एक आठवण सांगताना ऐमेकर म्हणाले, ‘मुलगा चीनमध्ये, तर मुलगी अमेरिकेला. अशात मित्रमंडळींनी त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत आणला. ते सर्व जण गेटवरच थांबले. अखेर मी पुढाकार घेत त्यांचा मुलगा बनून त्या मृतदेहाला अग्नी दिला. प्रत्येक वेळी पाठीशी येथील मृत्यू नोंदणी कारकून वंदना सुनील अवसरमल या नेहमीच उभ्या असतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी स्मशानभूमीत पालिका प्रशासनाकडूनही सॅनिटायझर, पीपीई किट तसेच अन्य सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व काळजी घेतली जात आहे. स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत ऐमेकर हे मृतदेह सरणावर चढवून पुढील सर्व प्रक्रिया पार पाडतात.‘घरापेक्षा समाजाची जबाबदारी सर्वश्रेष्ठ’‘माझ्या या कामामुळे कुटुंबीयांना बाधा तर होणार नाही ना, अशी भीती सतत वाटते. मात्र समाजाप्रति असलेली माझी जबाबदारी या सर्वांपेक्षा मोठी आहे. त्यात वरिष्ठही वेळोवेळी काळजी घेत, मार्गदर्शन करत असल्याने धीर मिळतो,’ असे विलास ऐमेकर यांनी सांगितले.श्वानच सोबतीसुरुवातीला स्मशानभूमीच्या बाहेरील रस्त्यावर दिवे नव्हते. तेव्हा दीड किलोमीटरचा रस्ता पार करेपर्यंत येथील तीन श्वान त्यांच्या सोबतीला असायचे. आताही रात्री घरी जाण्याच्या वेळेस हेच श्वान मुख्य रस्त्यापर्यंत सोबतीला येतात, असे विलास ऐमेकर यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या