Join us  

CoronaVirus News: 'सरासरीच्या पदवी प्रमाणपत्रांमुळे नोकरीत अडथळा येणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:56 AM

उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आश्वासन

मुंबई : अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतचा निर्णय अद्याप स्पष्ट झाला नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. सरकार विद्यार्थी हिताचाच निर्णय घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा स्पष्ट केले. तसेच अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांमुळे प्रदेशात जाण्यासाठी किंवा नोकरीत पदवी प्रमाणपत्रामुळे कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठीच्या पुढील कामावर विचारविनिमय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, ओडिशासारख्या राज्यात अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयआयटी, व आॅक्सफोर्डसारख्या शिक्षण संस्थांनीही परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली.सरासरी गुणांमुळे मिळणाऱ्या पदवी प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नसल्याची हमी त्यांनी दिली आणि त्या दृष्टीने अभ्यास सुरू असल्याचेही सांगितले. यूजीसीला पाठवलेल्या परीक्षा रद्दच्या निर्णयावर ठाम असून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करू तोपर्यंत विद्यार्थ्यांनी गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावणारअकृषी विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाला शिकणाऱ्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉगला आहेत. याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेता येईल, मात्र आधी अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय घेऊ असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या