Join us  

coronavirus: पालिकेतील सर्व बैठका आता सदस्यांच्या उपस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 6:02 AM

Mumbai Municipal Corporation : मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिका मुख्यालयातील महासभेपासून वैधानिक व अन्य समित्यांच्या बैठका रद्द करण्यात आल्या होत्या.

मुंबई : कोरोना काळात फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी पालिका मुख्यालयातील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. जुलै महिन्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या बैठका सुरू झाल्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आल्याने सर्व बैठका पालिका मुख्यालयात सदस्यांच्या उपस्थितीत घ्या, असे परिपत्रक पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढले. मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिका मुख्यालयातील महासभेपासून वैधानिक व अन्य समित्यांच्या बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही समितीच्या बैठका अथवा महासभा झाली नाही. मात्र विकासकाम खोळंबल्याने जुलै महिन्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेण्यास सुरुवात झाली. पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत प्रत्यक्ष बैठक घेण्याची परवानगी मागितली होती. पालिकेची बाजू मान्य करीत न्यायालयाने स्थायी समितीच्या बैठका घेण्यास परवानगी दिली. तरीही इतर वैधानिक समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. मात्र आता सर्वच बैठका प्रत्यक्ष घेण्याची परवानगीही मिळाल्यामुळे नगरसेवक तसेच कर्मचारी अशा ४० जणांच्या उपस्थितीत यापुढे बैठका होतील. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्व समितीच्या ऑनलाइन बैठका बंद करून सदस्यांच्या उपस्थितीत घ्याव्यात, असे परिपत्रक पालिका आयुक्तांनी काढले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई