Join us  

कोरोनाच्या मृत्युदरात २.२ टक्के झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:59 AM

महिन्याभरातील आकडेवारी : पुढील ३० दिवसांत आणखी घट करण्याचे मुंबई पालिकेचे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी गेल्या ३१ दिवसांमध्ये मृत्युदरात २.२ टक्के घट झाली आहे. तसेच कोविड मृत्यूचा आतापर्यंतचा दर ५.४ वरून ४.६ टक्के एवढा कमी झाला आहे. पुढील ३० दिवसांमध्ये मृत्युदरात आणखी घट करण्याचे महापालिकेचे लक्ष्य असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी सांगितले.आॅगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असे वाटत असताना १ सप्टेंबरपासून मुंबईत दररोज दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. मात्र २० जून ते १९ जुलै या काळात २,२८८ एवढा असलेला मृतांचा आकडा गेल्या महिन्यात निम्म्यावर आला. २० आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या ३१ दिवसांच्या कालावधीत १,१५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण तब्बल ९२ टक्के असल्याची बाब समोर आली आहे.ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ५.१४ टक्के असून, त्या खालील वयोगटात हे प्रमाण ०.४ टक्के आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या महिन्याभरात ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण मात्र वाढल्याचे आढळून आले. १७ हजारांवर आलेला सक्रिय रुग्णांचा आकडा गेल्या ३१ दिवसांमध्ये दुप्पट झाला. यापैकी नऊ हजार रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रयत्नांमुळे मृत्युदरात घटदर सोमवारी पालिका आणि खासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंचा आढावा घेऊन त्याचा बारकाईने अभ्यास केला जातो. मुंबईतील नामांकित रुग्णालयांतील ३५ तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत जम्बो कोविड सेंटरमधील डॉक्टरांना दूरध्वनीवरून अथवा प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाते. या सर्व प्रयत्नांमुळेच मृत्युदरात हळूहळू घट होत असल्याचा दावा पालिका आयुक्त चहल यांनी केला आहे.बेडची कमतरता नाहीदररोज १५ हजारांहून अधिक संशयित रुग्णांची चाचणी होत असल्याने रुग्णांचा आकडा एक हजारावरून दोन हजारांवर पोहोचला आहे. तरी सध्या कोविड रुग्णांसाठी ४,७७७ खाटा तर अतिदक्षता विभागात २७१ खाटा उपलब्ध आहेत. खाटांचे योग्य नियोजन करून गरजू रुग्णांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी विभाग स्तरावरील वॉररूममार्फत कार्यवाही केली जात असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस